राजस्थानमधील भाजपाचे माजी आमदार ज्ञानदेव आहुजा यांचा एक धक्कादयक व्हिडीओ समोर आला आहे. या कथित व्हिडीओमध्ये आहुजा “आम्ही गायीच्या तस्करीमध्ये सामील असलेल्या पाचजणांना मारले आहे,” असे आहुजा सांगताना दिसत आहेत. गोविंदगड येथील चिरंजी लाला नावाच्या व्यक्तीला चोर असल्याचे समजून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चिरंजी लाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी ज्ञानदेव आहुजा गोविंदगड येथे गेले होते. यावेळी आम्ही पाच जणांची हत्या केली आहे, असे ते आपल्या सहकाऱ्यांना सांगताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर येताच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी
“पंडितजी आम्ही आतापर्यंत पाज जणांना मारलं आहे. मग ते लालवंडी (रकबर मॉब लिंचिंग) असो किंवा बेहरोर (पेहलू खान मॉब लिंचिंग)असो. या भागात पहिल्यांदाचा त्यांनी कोणाचीतरी हत्या केली आहे,” असे आहुजा म्हणताना दिसत आहेत. तसेच “गायींची कत्तल करण्यामागे जे असतील त्यांना मारण्यासाठी मी माझ्या माणसांना पूर्ण मोकळीक दिलेली आहे. आम्ही तुम्हाला जामिनावर सोडवू,” असेदेखील आहुजा म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> Video : “…त्यानंतर मी पूर्णपणे बरा झालो,” ‘भारत के राजीव’ म्हणत काँग्रेसने शेअर केला अटल बिहारी वाजपेयी यांचा जुना व्हिडीओ
दरम्यान, ज्ञानदेव आहुजा यांचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलवर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वानी गौतम यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. “स्थानिक पोलिसाच्या तक्रारीनुसार आहुजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५३ ए अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असताना अतिरिक्त कलमे जोडली जातील,” असे तेजस्वानी गौतम म्हणाल्या.