एपी, साओ पावलो
ब्राझीलचे माजी अध्यक्ष जाइर बोलसनारो यांच्यावर मंगळवारी गुन्हेगारांशी संबंध ठेवल्या प्रकरणी आणि स्वत:च्या कोविड-१९ लसीकरणाशी संबधित आकडेवारीत फसवणूक केल्या प्रकरणी औपचारिकपणे आरोप ठेवण्यात आले आहोत. ब्राझीलच्या फेडरल पोलिसांनी बोलसनारो यांच्यावर पहिल्यांदाच आरोप ठेवले असून त्यांच्यावर अन्य काही आरोपही ठेवले जातील अशी शक्यता आहे.
बोलसनारो हे २०१९ ते २०२२ दरम्यान, म्हणजे जगात करोनाची महासाथ असताना ब्राझीलचे अध्यक्ष होते. ते आणि अन्य १६ जणांनी सार्वजनिक आरोग्य डेटाबेसमध्ये खोटी माहिती भरली, जेणेकरून तेव्हा अध्यक्ष असलेले बोलसनारो, त्यांची १२ वर्षांची मुलगी आणि त्यांच्या निकटवर्तीयांपैकी इतर अनेकांनी कोविड-१९ लस घेतल्याचा समज झाला असे आरोप फेडरल पोलिसांनी सादर केलेले लेखी आरोपपत्रात करण्यात आले आहेत. ब्राझीलच्या सुप्रीम कोर्टाने मंगळवारी हे आरोपपत्र प्रसिद्ध केले.
हेही वाचा >>>“अक्का, तिहारमध्ये तुमचं स्वागत!”, के.कविता यांच्या अटकेनंतर गँगस्टर सुकेश चंद्रशेखर याचं तुरुंगातूनच पत्र
या आरोपपत्रावर सही केलेले पोलीस डिटेक्टिव्ह फॅबियो अल्वारेझ शोर यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे की, बोलसनारो आणि त्यांच्या सहाय्यकांनी (लसीकरण) प्रमाणपत्र जारी केले जाण्यासाठी आणि आरोग्य निर्बंधांच्या संबंधाने फसवणूक करण्यासाठी त्यांचा वापर करण्यासाठी आपल्या लसीकरण नोंदी बदलल्या. तपासामध्ये असे आढळले की, नोव्हेंबर २०२१ आणि डिसेंबर २०२२ यादरम्यान अनेक खोट्या नोंदी करण्यात आल्या तसेच बनावट दस्तऐवजांचा वापर करण्याची अनेक कृत्ये करण्यात आली असेही शोर यांनी सांगितले आहे.