Leader of Opposition Party of Delhi : दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी रेखा गुप्ता यांची निवड झाल्यानंतर आता आपने विरोधी पक्षनेताही जाहीर केला आहे. दिल्लीच्या माजी काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी आता दिल्लीच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या असतील. त्यामुळे या निमित्ताने दिल्लीत महिला विरुद्ध महिला असा सामना पाहायला मिळणार आहे.
दिल्लीत आम आदमी पक्षाला पराभव पत्कारावा लागल्यानंतर भाजपाने सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पदासाठी रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून २५ फेब्रुवारी रोजी सर्व आमदार पदाची शपथ घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आपच्या नेत्यांनी आतिशी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली. आज दुपारी १ वाजता आमदार आणि वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह आणि त्यांच्या आघाडीच्या संघटनांच्या प्रभारींबरोबर बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीदरम्यान त्यांच्या भूमिकांचे मूल्यांकन करण्यासाठी लोकसभा, जिल्हा, विधानसभा आणि वॉर्ड पातळीवरील सर्व कार्यकर्त्यांचे ऑडिट जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले.
पहिली मंत्रिमंडळ बैठक संपन्न
नवनिर्वाचित विधानसभेचे सदस्य (आमदार) २५ फेब्रुवारी रोजी शपथ घेतील, तर १४ प्रलंबित कॅग अहवाल दुसऱ्या दिवशी मांडले जातील. मागील आप सरकारच्या कार्यकाळापासून प्रलंबित असलेले कॅग अहवाल सादर करण्यास मान्यता रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिली. गुप्ता यांनी शनिवारी राष्ट्रीय राजधानीच्या आगामी अर्थसंकल्पावरील बैठकीचे अध्यक्षस्थान भुषविले. यामध्ये सर्व कॅबिनेट मंत्री आणि विभाग प्रमुख उपस्थित होते.
निवडणूक निकालानंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या विजयी उमेदवारांनी भेट घेतली. यावेळी केजरीवाल यांनी त्यांना लोकांसाठी काम करण्याचा आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा सल्ला दिला. पक्ष रचनात्मक विरोधक म्हणून काम करेल असे आतिशी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी सांगितले.