Former Chief Election Commissioner SY Quraishi : माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांच्यावर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी टीका केली. त्यांना मुस्लिम आयुक्त संबोधित करून सर्वाधिक बांगलादेशी घुसखोरांना त्यांच्या काळात मतदार बनवण्यात आल्याचा दावा दुबे यांनी केला. दुबे यांच्या या टीकेवर आता कुरेशी यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
“मी भारताच्या अशा कल्पनेवर विश्वास ठेवतो की जिथे व्यक्तीची व्याख्या त्याच्या योगदानावरून होते. काही लोकांसाठी धार्मिक ओळखी त्यांच्या द्वेषपूर्ण राजकारणाला पुढे नेण्यासाठी प्रमुख घटक आहेत. भारताने आपल्या संवैधानिक संस्था आणि तत्त्वांसाठी नेहमीच उभे राहून लढा दिला आहे, आहे आणि राहील. मी निवडणूक आयुक्त या संवैधानिक पदावर माझ्या क्षमतेनुसार काम केले आणि आयएएसमध्ये माझी दीर्घ आणि समाधानकारक कारकीर्द होती”, असं कुरेशी म्हणाले. असं वृत्त पीटीआयने दिलं आहे. कुरैशी जुलै २०१० ते जून २०१२ पर्यंत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते.
नेमकं प्रकरण काय?
वक्फ कायद्याबाबत एस. वाय. कुरेशी यांनी सोशल मीडिया पोस्ट केली होती. “वक्फ कायदा निःसंशयपणे मुस्लिमांची जमीन बळकावण्यासाठीची सरकारची भयानक योजना आहे. मला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालय यावर प्रश्न उपस्थित करेल. भाजपाच्या अपप्रचार व्यवस्थेने चुकीची माहिती पसरवण्याचं त्यांचं काम उत्तमपणे केलं आहे.”
कुरेशी यांच्या या पोस्टला उत्तर देताना भाजपाचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले, “तुम्ही निवडणूक आयुक्त नव्हतात, तुम्ही मुस्लिम आयुक्त होता. तुमच्या कार्यकाळात झारखंडमधील संथाल परगणामध्ये सर्वाधिक बांगलादेशी घुसखोरांना मतदार बनवण्यात आले. पैगंबर मुहम्मद यांचा इस्लाम भारतात ७१२ मध्ये आला. त्यापूर्वी ही जमीन (वक्फ) हिंदू किंवा त्या धर्माशी संबंधित आदिवासी, जैन किंवा बौद्धांची होती,” असे ते पुढे म्हणाले.
दुबे पुढे म्हणाले, “आपण या देशातील लोकांची एकजूट वाढवली पाहिजे. देश एकजुट करा, इतिहास वाचा. या देशाचे दोन तुकडे करून पाकिस्तान जन्माला आला आहे. आता पुन्हा एकदा देशाची फाळणी होणार नाही.”