पणजी: भाजपने उमेदवारी नाकारल्याने गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ६५ वर्षीय पार्सेकर जाहीरनामा समितीचे अध्यक्ष होते. मांद्रे मतदारसंघात भाजपने दयानंद साप्ते यांना उमेदवारी दिल्याने पार्सेकर नाराज आहेत. या मतदारसंघातून ते २००२ ते १७ या कालावधीत ते आमदार होते.  गेल्या निवडणुकीत त्यांचा साप्ते यांनी पराभव केला होता. मात्र २०१९ मध्ये साप्ते यांनी इतर नऊ जणांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्या मी पक्ष सोडणार आहे, पुढे काय करायचे हे लवकरच जाहीर करू असे पार्सेकर यांनी नमूद केले. मांद्रे मतदारसंघातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना साप्ते दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप पार्सेकर यांनी केला. पार्सेकर हे २०१४ ते १७ या काळात गोव्याचे मुख्यमंत्री होते. मनोहर पर्रिकर केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेल्यानंतर राज्याची धुरा पार्सेकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

Story img Loader