पीटीआय, भोपाळ/नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाचे गूढ रविवारीही कायम राहिले. त्यांच्या काही समर्थक आमदार कार्यकर्त्यांनी दिल्लीकडे धाव घेतली असली, तरी अद्याप कमलनाथ यांनी आपले पत्ते उघड केलेले नाहीत. दुसरीकडे कमलनाथ व त्यांचे पुत्र खासदार नकुलनाथ पक्ष सोडणार नसल्याचा दावा काँग्रेसमधून केला जात आहे.

महाराष्ट्रात मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी आणि अशोक चव्हाण या तिघांनी एकपाठोपाठ एक काँग्रेस सोडल्यानंतर आता मध्य प्रदेशात पक्ष फुटीच्या उंबरठय़ावर आला आहे. कमलनाथ यांनी शनिवारी दिल्लीमध्ये धाव घेतली असून ते भाजप श्रेष्ठींच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानाबाहेर ‘जय श्री राम’ लिहिलेला ध्वज फडकत असल्याचे दिसत असून त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाना उधाण आले आहे. रविवारी छिंदवाडा येथील तीन आमदार दिल्लीत दाखल झाले असून आणखी किमान तीन आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या आमदारांचे दूरध्वनी संपर्काबाहेर असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा >>>यूट्यूबच्या माजी सीईओंच्या मुलाचा वसतीगृहात आढळला मृतदेह, कारण अद्याप अस्पष्ट

दुसरीकडे, मध्य प्रदेश काँग्रेसकडून कमलनाथ यांच्या संभाव्य बंडाच्या बातम्या खोडून काढल्या जात आहेत. ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी कमलनाथ पक्ष सोडणार नसल्याचा दावा केला आहे. ‘भाजप सत्तेचा दुरुपयोग करून माध्यमांचा वापर करून घेत आहे. यामुळे एका व्यक्तीच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माझे कमलनाथ यांच्याशी बोलणे झाले असून माध्यमांतील वृत्त हा कट असल्याचे त्यांनी मला सांगितले आहे. मी काँग्रेसवासी आहे आणि यापुढेही राहीन, असे कमलनाथ यांनी आश्वस्त मला केले आहे,’ अशी माहिती पटवारी यांनी दिली. कमलनाथ यांच्या कथित पक्षप्रवेशाबाबत भाजपकडून संपूर्ण मौन बाळगण्यात येत आहे.

कमलनाथ हे पक्ष सोडून जाणार नाहीत. ते ईडी, प्राप्तिकर विभाग किंवा सीबीआयच्या दबावाला बळी पडणार नाहीत, तो त्यांचा स्वभाव नाही. – दिग्विजय सिंह, ज्येष्ठ नेते, काँग्रेस

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former chief minister of madhya pradesh and senior congress leader kamal nath joins bjp amy
Show comments