D. Y. Chandrachud on Pune bus rape Case : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यासाठी १३ पथके स्थापन करण्यात आली आहेत. इतकेच नाही तर पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्यासाठी १ लाख रुपायांचे बक्षीस देखील जाहीर केले आहे. या धक्कादायक प्रकारानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यादरम्यान भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी देखील या प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रचूड नेमकं काय म्हणाले?
पुण्यात झालेल्या बलात्काराच्या घटनेवर माजी सीजेआय डी. वाय चंद्रचूड यांनी प्रतिक्रिया देताना कायद्याच्या योग्य अंमलबजावणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. पीटीआय या वृ्त्तसंस्थेशी बोलताना चंद्रचूड म्हणाले की, “आपल्याकडे विशेषतः निर्भया बलात्कार प्रकरण झाल्यानंतर कायद्यात अनेक बदल करण्यात आले. फक्त कायद्याच्या माध्यमातूनच आपण अशा घटना कमी करू शकत नाहीत, कायद्याशिवायही समाजावर देखील मोठी जबाबदारी आहे आणि कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. समाजात मोठ्या प्रमाणात महिला नोकरी, शिक्षणासाठी घरापासून दूर जाऊन काम करत आहेत. त्यामुळे प्रत्येक स्तरावर महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली पाहिजे, जेणेकरून महिला जेथे कुठे जातील तेथे त्यांना सुरक्षित वाटेल.”
चंद्रचूड पुढे बोलताना म्हणाले की, “असे उदाहरण समोर आल्यानंतर त्याच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करणे , योग्य पद्धतीने तपास होणे, लवकरात लवकर सुनावणी होऊन शिक्षा होणे हे खूप गरजेचे आहे. न्यायव्यवस्था आणि पोलिसांची यामध्ये मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक स्तरावर आपण यावर लक्ष देऊन विचार केला पाहिजे, जेणेकरून आपण एक नवीन समाजाकडे पुढे जाऊ शकू, जेथे आपल्या समाजातील अर्धा हिस्सा असलेल्या महिला सुरक्षितपणे नोकरी, शिक्षण अशी प्रत्येक गोष्ट करू शकतील,” असेही चंद्रचूड म्हणाले.
स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरण
पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आली. या प्रकारानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांनीही आरोपीच्या शोधासाठी १३ पथके तैनात केली आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार होता, त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीचा शोध घेण्याकरता पुणे पोलिसांनी १ लाखांचे बक्षिसही जाहीर केलेअसून त्याच्या कुटुंबियांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात स्वारगेट स्थानकात तैनात असलेल्या २३ सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलं आहे.