रायपूर : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सादर केलेल्या तपासाच्या आधारे छत्तीसगडमधील आर्थिक गुन्हे शाखेने माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि इतरांविरुद्ध ‘महादेव अ‍ॅप’शी संबंधित ‘ऑनलाइन’ सट्टेबाजी घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. ‘महादेव अ‍ॅप’शी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा एक वर्षांहून अधिक काळ तपास करत असलेल्या ‘ईडी’ने छत्तीसगडमधील विविध प्रतिष्ठित राजकारणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप अलिकडे केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> रोख्यांतून भाजपला ६,९८६ कोटी; काँग्रेसला १,३३४ कोटी; फ्युचर गेमिंगचे द्रमुकला ५०९ कोटी

‘महादेव अ‍ॅप’चे दोन मुख्य प्रवर्तक छत्तीसगडचे आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील आर्थिक गुन्ह्यातून अंदाजे सुमारे सहा हजार कोटींचे उत्पन्न लाटण्यात आले. ‘ईडी’ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. राज्य आर्थिक गुन्हे शाखा-लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सादर केलेल्या अहवालाच्या आधारे, ४ मार्च रोजी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस ठाण्यात बघेल आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एका पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल, ‘अ‍ॅप’ प्रवर्तक रवी उप्पल, सौरभ चंद्राकर, शुभम सोनी आणि अनिल कुमार अग्रवाल आणि अन्य १४ जणांचे प्राथमिक तपास अहवालात आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. या प्रकरणात काही वरिष्ठ सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, विशेष तपास अधिकारी (ओएसडी) आणि इतर अज्ञात खासगी व्यक्तींविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cm of chhattisgarh bhupesh baghel in trouble over mahadev app case zws