राजस्थानमध्ये अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष निर्माण झाला असून पुन्हा एकदा राज्य सरकार संकटात सापडलं आहे. अशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होण्याच्या तयारीत असताना, सचिन पायलट मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. पण अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांचा सचिन पायलट यांच्या नावाला विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर ८२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
राजस्थानातील राजकीय संकटाबाबत विचारलं असता काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जे गाव सोडलंय, त्याचं नाव घेऊ इच्छित नाही” अशा शब्दांत गुलाम नबी आझादांनी प्रतिक्रिया दिली आहे. आझाद यांनी अलीकडेच २६ ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षाची सर्व सल्लागार यंत्रणा उद्ध्वस्त केल्यावरून आझादांनी राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली होती.
हेही वाचा- “अजित पवार वस्तुस्थिती जाणणारे नेते”, फडणवीसांवरील ‘त्या’ विधानावरून चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
राजस्थानातील सत्तासंघर्ष नेमका काय आहे?
राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. ‘एक व्यक्ती, एक पद’ या नियमामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार आहे. त्यामुळे विधिमंडळ गटाचा नवा नेता निवडण्यासाठी त्यांनी रविवारी रात्री आमदारांची बैठक बोलावली होती. पक्षाचे प्रभारी अजय माकन आणि पक्षनिरीक्षक म्हणून मल्लिकार्जुन खरगेही बैठकीला उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटही या बैठकीला हजर झाले होते. या बैठकीमध्ये केवळ नेतानिवडीचे सर्वाधिकार केंद्रीय नेतृत्वाला देण्याची औपचारिकता पार पाडली जाणार असल्याचे गेहलोत यांनी स्वत: जाहीर केले होते. मात्र, बैठकीपूर्वी गेहलोत समर्थक आमदारांनी राजीनामास्त्र उगारले आहे.
हेही वाचा- राजस्थानमध्ये राजकीय वादळ; काँग्रेसच्या ८२ आमदारांचा विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द
रविवारी रात्री उशिरा गेहलोत समर्थक ८० हून अधिक आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवासस्थानी जाऊन एकत्रित राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे राजस्थानातील काँग्रेस सरकार धोक्यात आलं आहे. या सर्व प्रकारामुळे काँग्रेसचं हायकमांड गेहलोत यांच्यावर नाराज असल्याची माहिती मिळत आहे.