प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध देशभर निदर्शने केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील याचे पडसाद उमटले आहेत. यानंतर भाजपाने नुपूर शर्मा यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. शर्मा यांना देशभरातून विरोध होत असताना, माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी नुपूर शर्मा यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौतम गंभीरने ट्वीट करत म्हटलं की, “माफी मागितल्यानंतरही एका महिलेबाबत देशभर द्वेषपूर्ण बोललं जात आहे. तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत तथाकथित ‘सेक्युलर लिबरल’ लोकांचं मौन चिंताजनक आहे.”

गौतम गंभीर यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर गंभीरने स्पष्टीकरण देत म्हटलं की, “नूपूर शर्मा यांनी केलेल्या विधानांचं कोणीही समर्थन केलं नाही. पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई केली आहे आणि त्यांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टपणे माफी देखील मागितली आहे. ”

यावेळी त्यांनी प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणी देशभर सुरू असलेल्या निदर्शनांचा संदर्भ देत म्हटलं, “द्वेषाचे जाहीर प्रदर्शन, तिच्या आणि तिच्या कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि देशातील विविध भागात सुरू असलेल्या दंगली चिंताजनक आहेत. यावर तथाकथित धर्मनिरपेक्ष उदारमतवाद्यांचं मौन आणखी आश्चर्यकारक आहे. अनेक ठिकाणी दंगलखोरांचा मुक्तपणे वावर सुरू असून काही राज्यात व्होट बँकेचं राजकारण सुरू झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने उचलेल्या कठोर पावलांचं मी कौतुक करतो. विसाव्या शतकातील भारतात अशा प्रकारचं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही,” असंही ते म्हणाले.

गौतम गंभीर यांच्याशिवाय सफदरजंगच्या माजी नगरसेविका राधिका अब्रोल यांनीही आपल्या फेसबूक पेजवर एक व्हिडीओ शेअर करत नुपूर शर्मा यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी संबंधित व्हिडीओमध्ये म्हटलं की, “नूपूर शर्मा, एक हिंदू महिला असून त्यांनी काहीही चुकीचं बोललं नाही. मुस्लिमांच्या भावना दुखावण्यासाठी त्यांचा व्हिडीओ संपादित करून ट्विटरवर शेअर करण्यात आला,” असा दावा त्यांनी केला.

भाजपा नेते राहुल त्रिवेदी यांनी देखील नुपूर शर्मा यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, “पक्षाच्या विचारसरणीच्या वर कोणीही नाही. काही संघटना आणि त्यांचे लोक विदेशातून मिळालेल्या पैशाच्या जोरावर देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या हेतू कधीही यशस्वी होणार नाही. प्रत्येक राष्ट्रवादी व्यक्ती माझ्या बहिणीसोबत (नुपूर शर्मा) आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cricketer and bjp mp gautam gambhir support nupur sharma remark over prophet mohammad rmm