आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. एका माजी क्रिकेटरसह २ काँग्रेस आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. यात माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांचा समावेश आहे. त्यांनी मंगळवारी (२८ डिसेंबर) भाजपात प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय काँग्रेसच्या २ आमदारांनीही भाजपात प्रवेश केला आहे.
४४ वर्षीय हा डावखरा फलंदाज पंजाबमधील आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनेश मोंगियाचा भाजपा प्रवेश झाला आहे. याशिवाय विद्यमान काँग्रेस आमदार फतेह सिंग बाजवा आणि बदविंदर सिंग लड्डी यांनी देखील भाजपात प्रवेश केलाय.
पंजाबमध्ये राजकीय घडामोडींना वेग
विशेष म्हणजे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बंडखोर नेते अमरिंदर सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंग धिंडसा यांनी नुकतीच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक केली. या बैठकीनंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी भाजपासोबत आगामी निवडणुकीतील युतीची अधिकृत घोषणा केली. यानंतर आता काँग्रेस आमदारांचा आणि माजी क्रिकेटर दिनेश मोंगिया यांचा भाजपा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
“भाजपाची पंजाबमधील ताकद वाढत आहे”
या भाजपा प्रवेशावर बोलताना भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत म्हणाले, “आम्ही या नव्या नेत्यांचं पक्षात स्वागत करतो. यामुळे भाजपाची पंजाबमधील ताकद वाढत आहे.”
हेही वाचा : शेतकरी आंदोलनातील नेत्याची मोठी घोषणा, नवा राजकीय पक्ष स्थापन, पंजाबमध्ये ‘इतक्या’ जागा लढवणार
भाजपाचं पंजाबमधील अस्तित्व कायमच दुय्यम राहिलं आहे. याआधी शिरोमणी अकाली दलासोबतची युती असतानाही भाजपा दुसऱ्या क्रमांकावरच होती. त्यामुळेच आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून पंजाबमधील प्रसिद्ध चेहरे पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचा परिणाम म्हणून सध्या या नेत्यांचा भाजपा प्रवेश होत आहे.