काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली यूपीए सरकारच्या काळातही पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते, असा दावा काँग्रेसकडून करण्यात येत असला, तरी लष्कराचे निवृत्त डीजीएमओ लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया यांनी उरी हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकची तुलना आधीच्या कारवाईंशी करता येऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या खुलाशानंतर काँग्रेस नेते पुन्हा एकदा तोंडावर पडले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनोद भाटिया हे २०१२ ते २०१४ या काळात भारतीय लष्करामध्ये डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स या पदावर कार्यरत होते. ते म्हणाले, पूर्वीची कारवाई आणि आताची कारवाई यांची तुलनाच होऊ शकत नाही. मला कोणत्याही राजकारणात पडायचे नाही. पण त्यावेळी करण्यात आलेली कारवाई ही पूर्णपणे वेगळ्या स्वरुपाची होती. वेगळ्या स्तरावर आणि वेगळ्या पद्धतीने ती हाताळण्यात आली होती. पण उरी हल्ल्यानंतर करण्यात आलेले सर्जिकल स्ट्राईक हे पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे आहेत. या सर्जिकल स्ट्राईकचे अपेक्षित परिणाम भारताला दिसले आहेत. त्यामुळेच खरंतर या हल्ल्यांवरून सध्या देशात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आपण कोणीही थेटपणे लष्कराच्या कारवाईवर शंका उपस्थित करू नये, असे मला वाटते. तसे करणे योग्यही ठरणार नाही. त्यामुळेच सध्याचे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स आणि लष्करप्रमुख यांनी घेतलेल्या निर्णयावर कोणतीही शंका उपस्थित करण्यात येऊ नये, असे विनोद भाटिया यांनी म्हटले आहे. ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मते मांडली.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर लगेचच काँग्रेस नेत्यांकडून आमच्या कार्यकाळातही अशा पद्धतीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक कऱण्यात आले होते, असे सांगण्यात येऊ लागले. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सुद्धा यूपीए सरकारच्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे म्हटले होते. पण आम्ही कधीही त्याची जाहीरपणे वाच्यता केली नाही, असे त्यांनी म्हटले होते. यूपीए सरकारच्या कार्यकाळात तीन वेळा पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते, अशीही माहिती काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून सर्जिकल स्ट्राईकबद्दल जाहीरपणे माहिती देण्यात आल्याबद्दल त्यांच्यावर टीकाही करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर माजी डीजीएमओ लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया यांनी या कारवाईंमध्ये फरक असल्याचे म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former dgmo refutes congress claims of surgical strikes during upa tenure