Karnataka Former DGP Murdered in HSR Layout : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश (६८) यांची राहत्या घरी हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओम प्रकाश यांची पत्नी पल्लवी यांनी पोलीस नियंत्रण कक्ष ११२ वर फोन करून हत्या केल्याचे कबूल केले. दरम्यान या प्रकरणात ओम प्रकाश यांचा मुलगा कार्तिकेश याने काही मोठे खुलासे केले आहेत.

रविवारी संध्याकाळी बेंगळुरूमधील एचएसआर लेआउट येथील त्यांच्या राहत्या घरी ओम प्रकाश यांचा चाकूने वार केलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. दरम्यान पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम प्रकाश यांची पत्नी पल्लवीने फोनवर हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर घटनेवेळी घरात उपस्थित असलेल्या पल्लवी आणि त्यांच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले, पण त्यांचा मुलगा कार्तिकेश हा घटना घडली तेव्हा घरात नव्हता. एफआयआरनुसार, कार्तिकेश जेव्हा घरी आला तेव्हा त्याला त्याचे वडील रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आले होते.

एचएसआर लेआऊट पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनुसार, कार्तिकेशने हत्येसाठी त्याची आई किंवा बहि‍णीवर थेट आरोप करणे टाळले, तसेच तो घरी परतल्यानंतर त्याच्या वडीलांचा मृतदेह आढळून आला असेही त्याने सांगितले. इंडिया टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

आईकडून जीवे मारण्याच्या धमक्या

दरम्यान असे असले तरी, २० एप्रिल २०२५ मध्ये दाखल करण्यात आलेल्या अधिकृत तक्रारीमध्ये कार्तिकेश त्याने त्याच्या आईवर आरोप केले आहेत, आई त्याच्या वडीलांना गेल्या आठवडाभरापासून जीवे मारण्याची धमकी देत ​​होती, असे या तक्रारीमध्ये म्हटले आहे. या धमक्यांमुळे ओम प्रकाश हे तात्पुरते त्यांची बहीण सरिता कुमारी यांच्या घरी शिफ्ट झाले होते. घटनेच्या दोन दिवस आधी कृती ही सरिता कुमारी यांच्या घरी आली होती आणि तिने ओम प्रकार यांना घरी परत यावे यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला, असा आरोप आहे. ती ओम प्रकाश यांच्या इच्छेविरोधात त्यांना परत घेऊन आली, असेही सांगितले जात आहे.

कार्तिकेश सांगितले की, हत्या झाली त्या दिवशी तो डोमलूर येथील कर्नाटक गोल्फ असोसिएशनमध्ये होता, त्यावेळी त्याच्या शेजारी जयश्री श्रीधरन यांनी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास त्याला फोन करून त्याचे वडील खाली पडलेल्या अवस्थेत आढळल्याचे सांगितले. तो संध्याकाळी ५.४५ वाजता घरी पोहोचला तोपर्यंत पोलीस आणि लोक आधीच जमले होते.

एफआयआरमध्ये म्हटले आहे की, ओम प्रकाश रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत सापडले होते, त्यांच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा होत्या. त्याच्या मृतदेहाजवळ एक फुटलेली बाटली आणि चाकू आढळला. त्यांना तातडीने सेंट जॉन्स रुग्णालयात नेण्यात आले.

एफआयआरमध्ये असेही नमूद केले आहे की त्याची आई आणि बहीण दोघींना नैराश्याने ग्रस्त होत्या आणि त्यांचे वडिलांबरोबर नेहमी भांडण होत असे. “मला दाट संशय आहे की मा‍झ्या वडीलांच्या हत्येमध्ये त्यांचा सहभाग आहे,” असे कार्तिकेशने एफआयआरमध्ये म्हटले आहे आणि कायदेशीर कारवाईची विनंती केली आहे.

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसींनी सांगितले की, पल्लवीने भोसकून हत्या करण्यापूर्वी त्यांच्या चेहर्‍यावर मिरची पूड टाकण्यात आली होती. दोघांमध्ये शा‍ब्दिक वाद झाल्यानंतर पल्लवीने प्रकाश यांच्या चेहर्‍यावर मिरचीची पूड टाकली, असा दावा पोलीस विभागातील एक सूत्रांनी केला आहे. ओम प्रकाश यांनी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला यावेळी पल्लवीने त्यांच्यावर चाकूने अनेक वार केल्याचे सूत्रांनी सांगितले.

त्यानंतर तिने तिच्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला आणि “मी त्या राक्षसाला ठार केले आहे,” असे सांगितले असाही आरोप आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकातील दांडेली येथील जमिनीच्या प्रकरणातील वाद आणि या जोडप्यामध्ये सुरू असलेल्या वादातून ही हत्या झाली आहे. काही महिन्यांपूर्वी पल्लवीने जमिनीबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी एचएसआर लेआउट पोलिसांकडे संपर्क साधला होता असेही पीटीआयने म्हटले आहे. पण या तक्रारीबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.