गोव्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस बडे नेते असलेल्या लुईझिन्हो फालेरो यांनी पक्षातून आपला राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लुईझिन्हो फालेरो हे लवकरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात. फालेरो यांनी यापूर्वी नुकतंच ममतांचं कौतुक देखीलं केलं होतं. आता राजीनाम्यानंतर आपल्या समर्थकांना संबोधित करताना फालेरो म्हणाले की, “मी काँग्रेसमध्ये त्रस्त होतो. मला गोव्याचा हा त्रास संपवायचा आहे. जर माझं दुःख इतकं असेल कॉंग्रेससाठी मतदान करणाऱ्या गोव्यातील नागरिकांच्या दुर्दशेची कल्पना करा.”
“गोव्याचं हे दुःख लवकरात लवकर संपवूया. गोव्यात एक नवी पहाट आणूया. मी वयाने म्हातारा असू शकतो, पण माझं रक्त तरुण आहे”, असं लुईझिन्हो फालेरो म्हणाले. “मी नवेलीम विधानसभेच्या लोकांचे माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आभार मानतो आणि भविष्यातील सर्व प्रयत्नांमध्ये त्यांच्या निरंतर समर्थनाची अपेक्षा करतो”, असं ट्विट माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो-फालेरो यांनी केलं आहे.
ममता बॅनर्जी ‘स्ट्रीट फायटर’
२०१९ साली त्रिपुरा काँग्रेसचे प्रभारी राहिलेले फालेरो हे टीएमसीला मोठी मदत ठरू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, ते त्रिपुरामध्ये टीएमसीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतात. एका भाषणादरम्यान फालेरो यांनी ममता बॅनर्जी यांच वर्णन ‘स्ट्रीट फायटर’ असं केलं आहे. ममता बॅनर्जी फुटीरतावादी शक्तींशी लढत आहेत, असंही ते म्हणाले.
तृणमूल काँग्रेस गोवा विधानसभा निवडणूक लढवेल!
तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी अलीकडेच म्हटलं होतं की, “टीएमसी पुढील वर्षी गोव्यातील विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवार उभा करेल. पक्ष लवकरच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करेल. आम्ही इथे सत्ताधारी भाजपचे मोठे प्रतिस्पर्धी आहोत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील आमच्या पक्षात ‘हायकमांड संस्कृती’ नाही. त्या स्थानिक नेत्यांना उभे करतील”.
डेरेक ओब्रायन म्हणाले होते की, “राज्य भाजपला सत्तेपासून दूर ठेवणारा पक्ष शोधत आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना करू शकणारा कोणता नेता असेल तर त्या ममता बॅनर्जी आहेत.” एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “तृणमूल काँग्रेसच्या राज्यात निवडणुका लढवल्याने विरोधकांची मतं विभागली जाणार नाहीत.”