महेश सरलष्कर
नवी दिल्ली : राजकारणामध्ये आठ दिवसांचा काळही खूप मोठा असतो, अलीकडे तर चोवीस तासही खूप झाले असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. त्याचा अनुभव हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी घेतला. आपल्या हातून मुख्यमंत्रीपद निसटून जाईल याची त्यांना कुणकुणही नव्हती. इतक्यात त्यांना भाजपने लोकसभेचे उमेदवारही बनवून टाकले. खट्टर आता हरियाणातील करनाल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
प्रभावशाली जातीतील मुख्यमंत्री न देता इतर समुहातील होतकरू भाजप नेत्याला मुख्यमंत्री करण्याचा प्रयोग मोदी-शहांनी २०१४ पासून सुरू केला होता. हरियाणामध्ये पंजाबी खत्री समाजातून आलेल्या खट्टर यांनी नऊ वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले होते. साडेचार वर्षांपूर्वी दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पक्षाशी युती करून आपले स्थानही पक्के केले होते. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी हरियाणामध्ये विधानसभेची निवडणूक होणार असून आपल्याच नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवेल अशी खट्टर यांची अपेक्षा रास्त होती.
खट्टर यांचे पंतप्रधान मोदींशी मैत्रीचे नाते आहे, त्याचा उल्लेखही मोदींनी हरियाणातील कार्यक्रमामध्ये केलेला होता. पण, मोदींनी त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोदींनी त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लावले. या मानसिक धक्क्यातून खट्टर अजूनही सावरले नसल्याचे सांगतात.
खट्टर यांच्याशी मोदी असे का वागले, या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ‘यालाच म्हणतात मोदी’, असे मार्मिक उत्तर दिले! मनोहरलाल खट्टर हे संघाच्या शिस्तीत मोठे झाले असल्याने ते उघडपणे नाराजी व्यक्त करण्याची शक्यता नाही. संघटनेने वा पक्षाने अन्याय केला असे वाटले तरी ते बोलणार नाहीत. करनालमधून ते जिंकून खासदार बनले तरी त्यांच्या पुनर्वसनाची खात्री आत्ता कोणी देऊ शकत नाही.
खट्टर १९८४ मध्ये संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनले, त्यांनी संघाच्या कार्यासाठी १४ वर्षे वाहून घेतले. संघातून ते भाजपमध्ये आले. राष्ट्रीय महासचिव असताना हरियाणा जिंकून दिल्यामुळे २०१४ मध्ये खट्टर हरियाणामध्ये निवडणूक प्रचारप्रमुख बनले. मग, खट्टर थेट मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. अख्खे दशक हरियाणात सत्तेवर राहिल्यावर त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवणे म्हणजे रस्ता रुंदीकरणासाठी मोठे झाड मुळापासून उखडून ते ओसाड ठिकाणी रोवण्याजोगे असेल.