Lalit Modi Citizenship : क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध व सर्वात श्रीमंत लीग मानल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात ‘आयपीएल’चे माजी अध्यक्ष ललित मोदी आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण ललित मोदींनी भारतीय नागरिकत्व सोडल्याची चर्चा आहे. याचं कारण म्हणजे ललित मोदींनी त्यांचा भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ललित मोदींनी आता वानुआटू (Vanuatu) या देशाचं नागरिकत्व स्वीकारल्याचं वृत्त समोर आलं आहे.

ललित मोदींनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात आपला भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज केला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. तसेच दक्षिण पॅसिफिक बेट राष्ट्र वानुआटूचे नागरिकत्व स्वीकारल्याचंही स्पष्ट करण्यात आलं असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केलं आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

ललित मोदींनी वानुआटूचे नागरिकत्व घेतल्याच्या वृत्तांवरील प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की, “लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात ललित मोदींनी भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज केला आहे. याची माहिती मंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे. तसेच कायद्यानुसार ललित मोदींविरुद्ध असलेले सर्व खटले सुरु ठेवले जातील. सध्याच्या नियम आणि प्रक्रियांच्या आधारे सर्व तपासणी केली जाईल. आम्हाला असंही कळवण्यात आलं आहे की, ललित मोदींनी वानुआटुचे नागरिकत्व मिळवलं आहे” असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, ललित मोदींनी यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. ललित मोदींवर मनी लाँड्रिंग आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा, १९९९ (FEMA) चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर ललित मोदींना बीसीसीआयमधून निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर ललित मोदींनी भारत देश सोडला होता. आयपीएल २०१० नंतर ललित मोदींनी भारत देश सोडला होता. तेव्हापासून ललित मोदी लंडनमध्ये राहत असल्याचं बोललं जातं.