Shivdeep Lande Political Party: महाराष्ट्राचे सुपुत्र आणि बिहारमध्ये भारतीय पोलीस सेवेत एकेकाळी कर्तव्य बजावणाऱ्या शिवदीप लांडे यांनी अखेर राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हिंद सेना पक्षाची घोषणा केली. काही महिन्यांपूर्वीच लांडे यांनी आयपीएस पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा होती. अखेर शिवदीप लांडे यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा करून बिहारच्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
शिवसेनेचे (शिंदे) नेते आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे जावई असलेले शिवदीप लांडे हे महाराष्ट्रातील अकोल जिल्ह्यात जन्मले होते. २००६ च्या बॅचचे IPS अधिकारी असलेले लांडे यांची पोस्टिंग बिहारमध्ये झाली होती. तेव्हापासून ते बिहारचे दंबग पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते.
१९ सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांनी अचानक पोलीस सेवेतून निवृत्ती घेतली होती. राजीनामा देऊन आपण बिहारमध्येच राहणार असून या राज्याची सेवा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यावरून ते राजकारणात उतरणार असल्याचे बोलले जात होते. “मी बिहारमध्ये १८ वर्ष काम करून सेवा दिली. बिहार माझे कुटुंब आहे. जर माझ्याकडून नकळत काही चुकले असेल तर बिहारच्या जनतेने मला माफ करावे. आज मी पोलीस दलाचा राजीनामा देत आहे. पण बिहारसाठी यापुढेही काम करत राहिल”, अशी पोस्ट शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर लिहिली होती.
पत्रकार परिषदेत बोलताना शिवदीप लांडे म्हणाले की, मी नोकरीची सुरुवात जय हिंद बोलून केली होती. त्याच उत्साहात आता राजकीय क्षेत्रात पदार्पण करत आहे. युवकांसाठी युवकांच्या माध्यमातून काम करणारा पक्ष, अशी आमच्या पक्षाची ओळख असेल. प्रत्येक युवकाला आज बदल हवा आहे. पण हा बदल घडविणार कोण? असा प्रश्न आहे. आम्ही युवकांसाठी एक माध्यम बनू इच्छितो.
कोण आहेत शिवदीप लांडे?
शिवदीप लांडे यांचा जन्म २९ ऑगस्ट १९७६ रोजी झाला. शेतकरी कुटुंबातून आलेल्या शिवदीप लांडे यांचे शिक्षण अकोला जिल्ह्यात झाले. त्यानंतर त्यांनी शेगावमधील श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीटेक केले. यानंतर यूपीएससीची तयारी करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली.
मुंबईत यूपीएससीची तयारी करत असताना त्यांची भारतीय महसूल सेवेसाठी (IRS) निवड झाली होती. मात्र त्यांनी पुन्हा प्रयत्न करून यूपीएससीची परीक्षा दिली आणि २००६ साली ते आयपीएससाठी निवडले गेले. लांडे यांना बिहार केडर मिळाले आणि त्यांची पहिलीच पोस्टिंग नक्षल प्रभावित असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर येथे झाली. यानंतर लांडे यांनी पटना, अररिया, पूर्णिया, रोहतास अशा अनेक जिल्ह्यांमध्ये विविध पदावर काम केले.
विजय शिवतारेंचे जावई
शिवदीप लांडे हे बिहार केडरचे आयपीएस असले तरी मध्यंतरी त्यांची नियुक्ती महाराष्ट्रात करण्यात आली होती. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांची मुलगी ममता यांच्याशी शिवदीप लांडे यांचे २०१४ साली लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी महाराष्ट्र दलात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तसा अर्जही त्यांनी दिला होता. त्यानंतर तीन वर्षांसाठी लांडे यांची महाराष्ट्र पोलीस दलात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्रात असताना अमली पदार्थ विरोधी पथक, दहशतवादी विरोधी पथकात लांडे यांनी सेवा दिली आहे.