जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे प्राणघातक हल्ल्यामध्ये निधन झाले. या हल्ल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली होती. एका सभेत भाषण देत असताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला होता. तेत्सुया यामागामी असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव असून हल्ल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, आता या हल्लेखोराबाबत नवीन माहिती समोर आली आहे. शिंजो आबे यांची हत्या केल्याचा पश्चाताप हल्लेखोराला होत आहे. “आईच्या धार्मिक मान्यांमुळे माझं आयुष्य उद्धवस्त झालं” असं हल्लेखोराचं म्हणणं आहे.
यामागामीचे कुटुंब एकेकाळी खूप श्रीमंत होते. परंतु त्याच्या आईने वादग्रस्त युनिफिकेशन चर्चला मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या, ज्यामुळे कुटुंब आर्थिक अडचणीत आले आणि या गोष्टीचा यामागामीला प्रचंड राग येत होता. काही जपानी नागरिकांनी ४१ वर्षीय यामागामीबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. सरकारी वकिलांकडून दाखल करण्यात आलेल्या सहानभूतीच्या विनंती याचिकेवर सुमारे सात हजार लोकांनी स्वाक्षरी केली आहे.
यामागामीची नोव्हेंबरपर्यंत कोठडीत रवानगी
मानसिक तपासणीसाठी यामागामीला नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्यात आले आहे. दक्षिण कोरियामध्ये १९५४ मध्ये स्थापन झालेल्या युनिफिकेशन चर्चबद्दलही यामागामीने सोशल मीडियावर आपला द्वेष व्यक्त केला. १९८० पासून त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत.
यामागामीच्या आईनेकडून सहा दशलक्ष येन चर्चेला दान
यामागामीच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आईने चर्चला दिलेल्या मोठ्या देणग्यांमुळे कुटुंबावर खूप परिणाम झाला. “माझी आई चर्चमध्ये सामील झाल्यानंतर (१९९० च्या दशकात), माझे संपूर्ण तारुण्यपण उध्वस्त झाले. सुमारे १०० दशलक्ष येन वाया गेले असल्याचा आरोप यामागामीने केला आहे. यामागामीच्या वडिलांचे १९९० च्या दशकात निधन झाले तेव्हा त्याच्या आईने ४० दशलक्ष येन किंमतीची मालमत्ता विकली. जवळजवळ सहा दशलक्ष येन चर्चला दान केले. परिणामी २००२ मध्ये यामागामीच्या कुटुंबाला दिवाळखोरीचा सामना करावा लागला.