तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयलिला यांच्या मृत्यूसंदर्भात चौकशी करणाऱ्या अहवालातील माहिती समोर आली आहे. या दीर्घ अहवालात तामिळनाडूतील एका उच्चपदस्थ शासकीय अधिकारी आणि जयललीता यांच्या जवळच्या सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्ही के शशिकला यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करायला हवी, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.
हेही वाचा >> राजस्थानच्या मंत्र्याचे मोठे विधान, केली राहुल गांधींची प्रभू श्रीराम यांच्याशी तुलना, म्हणाले…
उच्च न्याायलयाचे माजी न्यायमूर्ती ए अरुमुघस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली २०१७ साली एका चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. तेव्हा तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके पक्षाचे सरकार होते. जयललिता यांच्या मृत्यूसंदर्भातील वाद तसेच दाव्यांची चौकशी करण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाने दिलेला अहवाल आज तामिळनाडूच्या विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालात तत्कालीन मुख्य सचिव डॉ. राम मोहन राव यांना गुन्हेगारी कृत्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. तत्कालीन आरोग्यमंत्री विजया बासकर यांच्याविरोधातही काही निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे जयललिता यांच्या प्रकृतीसंदर्भात अपोलो रुग्णालयाचे चेअरमन डॉ. प्रताप रेड्डी यांनी खोटी विधाने केली होती, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मागील वर्षी अपोलो हॉस्पिटलने आम्हाला या चौकशीतून वगळावे अशी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली होती. माजी न्यायमूर्ती हे पक्षपाती असून त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील पूर्ण माहिती नाही, असा दावा अपोलो हॉस्पिटलने केला होता. त्यानंतर वैद्यकीय मंडळाची स्थापना करेपर्यंत या आयोगाच्या चौकशीला स्थगिती देण्यात आली होती.
हेही वाचा >> मोठी बातमी! BCCIच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती; सचिवपदी जय शाह कायम
जयललिता यांनी चार वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवले. त्या तामिळनाडूतील अत्यंत लोकप्रिय अशा नेत्या होत्या. मूळच्या अभिनेत्री असलेल्या जयललिता यांना तामिळनाडूमध्ये प्रेमाने अम्मा म्हटले जायचे. मात्र राजकीय कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. दरम्यान, समोर आलेल्या या अहवालानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.