कर्नाटक मधील काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी पुन्हा एकदा भाजपामध्ये प्रवेश केला आहे. २०२३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणूक अगदी जवळ आलेली असताना शेट्टर यांनी भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शेट्टर यांना भाजपाने तिकीट नाकारल्यामुळे नाराज होऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा जगदीश शेट्टर यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर भाजपामध्ये घरवापसी केली आहे. यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भाजपा नेते बी. एस. येडियुरप्पा, केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंह यादव, कर्नाटक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा आणि केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर उपस्थित होते.
भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर शेट्टर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “भाजपामध्ये मला अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. काही अडचणींमुळे मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मागील आठ ते नऊ महिन्यांपासून भाजपामधील नेत्यांसोबत चर्चा सुरू होती. अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी मला पुन्हा पक्षात प्रवेश करण्याबाबत सुचवले होते. मी भाजपामध्ये पुन्हा यावे अशी बी. एस. येडियुरप्पा आणि विजयेंद्र येडियुरप्पा यांची इच्छा होती.”
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोठा विजय संपादन करुन पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, असा विश्वासही शेट्टर यांनी भाजपामध्ये प्रवेश करताना व्यक्त केला. दरम्यान, जगदीश शेट्टर हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून कर्नाटकातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. कर्नाटकात भाजपाकडे चांगले नेतृत्व नसल्याने त्यांना शेट्टर यांची आठवण येत असल्याची टीका काँग्रेसचे नेते आणि मंत्री प्रियांक खरगे यांनी केली.
हेही वाचा : “मला वाटतं शोएब मलिक एक दिवस सना जावेदलाही घटस्फोट देईल आणि…”, तस्लिमा नसरीन यांची परखड शब्दांत टीका
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आश्चर्य व्यक्त केले
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शेट्टर यांच्या भाजपा प्रवेशावर आश्चर्य व्यक्त केले आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, “शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना भाजपामध्ये त्यांचा अपमान होत असल्याचे म्हटले होते. तसेच भाजपाने त्यांना विधानसभेचे तिकीट नाकारल्याचेही त्यांनी सांगितले होते. शेट्टर यांना काँग्रेसने २०२३ ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकिट दिले. परंतु, शेट्टर यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. तरीही काँग्रेस पक्षाकडून त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. भाजपमध्ये आपल्याला अपमानजनक वागणूक मिळत होती. त्यामुळे मी भाजपामध्ये पुन्हा प्रवेश करणार नाही, असे जगदीश शेट्टर मला म्हणाले होते.”. दरम्यान, जगदीश शेट्टर यांनी २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये अपमान होत असल्याचे माध्यमांसमोर सांगितले होते.
हेही वाचा : आंदोलन करणाऱ्या तरुणीला महिला पोलिस कर्मचार्यांनी केसांना पकडून नेले फरफटत, पाहा धक्कादायक Video
मोठा राजकीय बदल होणार – बोम्मई
कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शेट्टर यांच्या ‘घरवापसी’वर भाष्य केले आहे. “जगदीश शेट्टर यांनी त्यावेळी रागाच्या भरात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, काँग्रेसवरील प्रेमामुळे ते काँग्रेसमध्ये गेले नव्हते. काँग्रेसमध्ये ते खूप अस्वस्थ होते. त्यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला आहे. कर्नाटकात काँग्रेसची परिस्थिती बिघडत आहे. काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसकडे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ५० टक्क्यांहून अधिक चांगले उमेदवारदेखील नाहीत. त्यामुळे आम्ही यावेळी कर्नाटकात लोकसभेच्या २८ जागांपैकी २५ पेक्षा अधिक जागांवर विजयी होणार आहोत. घरवापसी आता सुरु झाली आहे. काँग्रेसमधील काही नेते देखील येत्या काळात भाजपामध्ये सामील होतील. आगामी काळात कर्नाटकात मोठा राजकीय बदल होणार आहे”, असे बोम्मई यांनी म्हटले आहे.
भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच शेट्टर यांना दिल्लीत मोठी जबाबदारी देणार असल्याचेदेखील बोम्मई म्हणाले.