कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेस, आपने उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर भाजपानेही आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. परंतु, या यादीत नाव न आल्याने नाराज झालेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावजी यांनी विधान परिषद सदस्य आणि भाजपा पक्षाचा राजीनामा दिला आहे. निवडणूक तोंडावर आलेली असताना भाजपातील या घडामोडींमुळे कर्नाटक विधानसभा निवडणूक वादळी ठरण्याची शक्यता आहे. सावजी यांच्यापाठोपाठ पक्षात इतरही अनेक इच्छुक नाराज असल्याचं बोललं जात आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने मंगळवारी १८९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीवरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावजी यांचे अथानी मतदारसंघातील तिकिट कापण्यात आले. त्यामुळे नाराज झालेल्या सावजी यांनी विधान परिषद सदस्य आणि पक्षाचा राजीनामा दिला. “मी हातात कटोरा घेऊन फिरणाऱ्यांपैकी नाही. मी एक स्वाभिमानी राजनेता आहे. मी कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही,” अशी प्रतिक्रिया लक्ष्मण सावजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार महेश कुमथल्ली यांना बेळगाव जिल्ह्यातील अथानी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सावजी अथानी मतदारसंघातून तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. परंतु, २०१८ मध्ये ते कुमथल्ली (तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते) यांच्याकडून सावजी यांचा पराभव झाला.
गुरुवारी सायंकाळी सावजी मोठा निर्णय घेणार असून शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी करणार असल्याचीही घोषणा लक्ष्मण सावजी यांनी केली आहे.
बोम्मई म्हणतात सर्वच खूश
पहिल्याच उमेदवार यादीमुळे नाराजीनाट्य रंगलेलं असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराव बोम्मई यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. उमेदवारांच्या यादीला सर्वांची सहमती असून या निर्णयावरून सर्व खूश आहेत, असं बोम्मई म्हणाले.
जगदीश शेट्टार यांनाही वगळलं
भारतीय जनता पार्टीकडून सहा वेळा आमदार राहिलेल्या जगदीश शेट्टार यांनाही पहिल्या यादीतून वगळण्यात आलं आहे. उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने जगदीश शेट्टार आता थेट दिल्लीदरबारी जाणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा केल्यानंतर सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आमदार महादेवप्पा यादवाद समर्थक आक्रमक
आमदार महादेवप्पा यादवाद यांनाही भाजपाने उमेदवारी दिलेली नाही. ते रामदुर्ग विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. या ठिकाणी आता नव्याने भाजपात आलेल्या चिक्का रेवाना यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे महादेवप्पा यादवाद यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. मंगळवारी उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर रात्री बेळगावी समर्थकांनी आंदोलन केले.