माजी आमदार आणि बसपचे नेते सर्वेशसिंह सिपू आणि अन्य एका व्यक्तीची शुक्रवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने जिल्ह्य़ात हिंसाचाराचा उद्रेक झाला असून निदर्शक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत पोलीस गोळीबारात एक व्यक्ती ठार झाल्याचेही वृत्त आहे. हिंसाचारात अन्य सहा जण जखमी झाले आहेत.
सिपू (३५) यांना नारद राय (४०) ही व्यक्ती काही कामानिमित्त भेटण्यासाठी आल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी सिपू यांच्या घराबाहेरच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर जिल्ह्य़ात हिंसाचाराचा उद्रेक झाला, असे पोलिसांनी सांगितले.
सिपू यांच्या हत्येचे वृत्त पसरताच त्यांच्या समर्थकांनी जियानपूर पोलीस ठाण्यावर हल्ला चढविला आणि पोलिसांच्या रायफली पळवून त्यांच्यावर दगडफेक केली. त्याचप्रमाणे पोलीस ठाण्याला आग लावण्याचा प्रयत्नही समर्थकांनी केला.
संतप्त जमावाने दोन ‘वज्र’ वाहने आणि सहा मोटारसायकली पेटविल्या. त्यामुळे जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. माजी आमदारासह अन्य दोन जण ठार झाले आहेत. मात्र पोलीस गोळीबारात एक जण ठार झाल्याच्या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही, असे पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) आर. के. विश्वकर्मा यांनी सांगितले.
पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी शेजारच्या मऊ, जौनपूर आणि आंबेडकरनगर जिल्ह्य़ांमध्ये शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
सिपू हे २०१२ पर्यंत समाजवादी पक्षाचे आमदार होते. गेल्या निवडणुकीत त्यांनी बसपामध्ये प्रवेश केला होता आणि सदर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मुलायमसिंह यादव यांच्या सरकारमध्ये सिपू यांचे वडील रामप्यारे सिंह हे मंत्री होते.

Story img Loader