मराठा आरक्षणाचं घोंगडं गेले कित्येक वर्षे भिजत पडलं आहे. भाजपा-शिवसेनेचं युती सरकार, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार आणि आता शिंदे गट-अजित पवार गट- भाजपा यांचं महायुतीच्या सरकारलाही मराठा आरक्षणाचा तिढा सोडवता आलेला नाही. यावरून बीडचे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस असून सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही. यावरून स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी दिल्लीत आज माध्यमांशी संवाद साधला.
संभाजी छत्रपती म्हणाले की, “मनोज जरांगे दरवर्षी आंदोलन करतात. त्यांच्या अनेक आंदलोनांना भेट दिली आहे. मराठा समाजाची जी भूमिका असेल तीच माझीही भूमिका असेल. सरकारने समिती स्थापन केली आहे, या समितीला नेहमी सुचित करत आलो आहे की जर तुम्हाला आरक्षण मिळवायचं असेल तर त्याचे विविध पॅरामिटर्स आहेत. आणि ते कशापद्धतीने सोडवता येतील यावर विचार केला पाहिजे. ते अद्यापही सुटलेले नाहीत असं माझं मत आहे.”
हेही वाचा >> “आरक्षण देणार नाही, असं कोर्टानेही…”, मनोज जरांगेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचं विधान
“सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज सामाजिक मागास नाही असं सिद्ध केलं आहे. सामाजिक मागास असल्याशिवाय तुम्हाला आरक्षणच मिळणार नाही. मराठा समाज हा पुढारलेला वर्ग आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे कोणतंही आरक्षण द्यायचं असेल तर पहिल्यांदा आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला मागास सिद्ध करावं लागेल. मनोज जरांगेंची जी भूमिका आहे, मराठा समाजाची जी भूमिका आहे, त्याबाजूने मी नेहमीच राहणार आहे. परंतु, टेक्निकल गोष्टी मी समोर ठेवल्या”, असंही संभाजी छत्रपती म्हणाले.
“२००७ पासून मी बाहेर फिरतोय, मला असं वाटतंय सरकारची एक बैठक होणं गरजेचं आहे. त्यांनी समाजाच्या भावना सांगितल्या आहेत. भावना आणि टेक्निकल गोष्टी एकत्र आणण्याकरता प्रयत्न झाले पाहिजेत”, असंही ते म्हणाले.
शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिलं
राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ साली पहिल्यांदा बहुजनांना आरक्षण दिलं होतं. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाला हे आरक्षण होतं. परंतु, मराठा समाज या छताखालून बाहेर फेकला गेला आहे, असंही ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे. अनेक मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या केली आहे. ही परिस्थिती वाढू नये. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असं आवाहनही संभाजी छत्रपती यांनी केलं आहे.