राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. १३ जुलैला दिल्लीतल्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात त्यांना दोषी ठरवलं होतं. आता या प्रकरणी विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दिल्ली विशेष न्यायालयाने काही वेळापूर्वीच हा निर्णय दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीबीआयने न्यायालयाने सांगितलं होतं की, जेएलडी यवतमाळ एनर्जी लिमिटेडला छत्तीसगडमधील पूर्व फतेहपूर कोळसा खाणी मिळाल्या होत्या. हा एका षडयंत्राचा भाग होता. यात पात्रतेच्या निकषांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. तसेच अर्जांमध्ये चुकीचे दावे करण्यात आले. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आरोप सिद्ध झालेलं हे १३ वं प्रकरण आहे.

दोषींमध्ये कुणाचा समावेश?

यात राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, कोळसा विभागाचे माजी सचिव एच. सी. गुप्ता, के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संचालक मनोज कुमार जयस्वाल इत्यादींचा समावेश आहे. या प्रकरणात एच. सी. गुप्ता आणि इतर दोन अधिकारी के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया या तिघांना प्रत्येकी तीन वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. JLD यवतमाळला कोर्टाने ५० लाखांचा दंडही ठोठावला आहे.

सीबीआयने या प्रकरणात २७ मार्च २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं. या आरोप पत्रात या सगळ्यांनी गैरमार्गाने कोळसा खाण आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात सीबीआयने २० नोव्हेंबर २०१४ या दिवशी क्लोजर रिपोर्ट सादर केला. मात्र तो स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला आणि प्रकरणाचा तपास सुरु ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणातल्या सर्वांना दिल्ली विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं आणि त्यानंतर आता आज विजय दर्डांसह इतरांना शिक्षाही सुनावण्यात आली.

राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना लिहिलेल्या पत्रांमध्ये चुकीचे तथ्य मांडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. डॉ.मनमोहन सिंग यांच्याकडे त्यावेळी कोळसा मंत्रालयाचा कारभार होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mp vijay darda and his son devendra sentenced four years jail in coal block allocation case scj