सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मंगळवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचे (NSE) माजी प्रमुख रवी नारायण यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली आहे. ईडीने यापूर्वी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना कथित फोन टॅपिंग प्रकरणात अटक केली होती.
कथित को-लोकेशन घोटाळा आणि बेकायदेशीर फोन टॅपिंग या दोन गुन्हेगारी प्रकरणांचा सीबीआयकडून समांतर तपास सुरू होता. यामध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराचे (NSE) माजी प्रमुख रवी नारायण यांचा सहभाग आहे का? याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येत होते. यानंतर अखेर आज ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत फोन टॅपिंग प्रकरणात रवी नारायण यांना अटक केल्याची माहिती समजत आहे. याबाबतचं वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिलं आहे.
ईडीने यापूर्वी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आणखी एक माजी प्रमुख आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांना कथित फोन टॅपिंग प्रकरणात अटक केली होती. तर या प्रकरणांचा समांतर तपास करणाऱ्या सीबीआयने चित्रा रामकृष्ण यांना ‘को-लोकेशन’ घोटळ्यात अटक केली होती.