पाकिस्तानचे माजी अध्यक्ष व हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांना सोमवारी विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप होता. गुन्हेगारी खटल्याला सामारे जाणारे ते पहिले लष्करशहा आहेत. मुशर्रफ हे व्यक्तिगत रीत्या न्यायालयात उपस्थित होते. त्यांना नोव्हेंबर २००७ मध्ये देशात आणीबाणी लादणे तसेच कलम ६ अन्वये राज्यघटना निलंबित करण, न्यायाधीशांची धरपकड करणे या आरोपानुसार राजद्रोहाखाली दोष ठरवण्यात आले. या प्रकरणात त्यांना मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते.दरम्यान आजारी आईला भेटण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीत जाऊ देण्याची मुशर्रफ यांची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.
न्यायालयात गुन्हेगारी स्वरूपाच्या खटल्याला सामोरे जाणारे मुशर्रफ हे पहिलेच माजी अध्यक्ष असून त्यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले, की आपण जे केले ते देशासाठी व लोकांसाठी केले, आपल्याला देशद्रोही संबोधणे दु:खदायक आहे. आपण वयाची ४४ वर्षे देशाच्या लष्करात सेवा केली. संरक्षण केले, देशाची प्रगती केली, प्रतिष्ठा वाढवली. त्यावर फिर्यादी पक्षाचे वकील अक्रम शेख यांनी आपण ‘राजद्रोही’ हा शब्द वापरलेला नाही, हे स्पष्ट केले. सिंध उच्च न्यायालयात न्या. फैजल अरब यांच्या नेतृत्वाखालील पीठाने माजी लष्करप्रमुख मुशर्रफ यांना दोषी ठरवले. त्या आधी फरोघ नसीम या मुशर्रफ यांच्या नवीन वकिलांनी न्यायालयाला अशी विनंती केली, की  आमच्या अशिलास त्यांच्या आजारी असलेल्या आईस भेटण्याकरिता संयुक्त अरब अमिरातीस जाऊ द्यावे कारण राज्यघटना कुठल्याही नागरिकाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मुशर्रफ स्वेच्छेने न्यायालयात आले होते व त्यांच्याविरोधातील वॉरंटही बजावलेले नाही, त्यांना स्वत:लाही बरे वाटत नाही, त्यामुळे त्यांना उपचारांसाठी अमेरिकेला जावे लागेल. संरक्षण खात्याने याबाबत दोन फाइल्स सादर केल्या असून त्यावर नंतर निर्णय घेतला जाईल, असे न्यायालयाने सांगितले. या खटल्याच्या वेळी न्यायालयात कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. मुशर्रफ यांना यापूर्वी आर्मड फोर्सेस इन्स्टिटय़ूट ऑफ कार्डिऑलॉजी या संस्थेत २ जानेवारीला दाखल करण्यात आले होते. पाकिस्तानात ६६ वर्षे लष्कराचे राज्य होते व कुठल्याही लष्करी कमांडरवर अशा पद्धतीने गुन्हेगारी खटला चालला नव्हता. मुशर्रफ हे गेल्या वर्षी मार्च महिन्यात स्वयंघोषित विजनवासातून निवडणूक लढवण्यासाठी पाकिस्तानात आले होते. २००७ मध्ये पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचा खून, बलोच नेते अरबर बुगटी यांचा २००६ मध्ये खून यांसह चार प्रकरणात त्यांच्यावर आरोप होते.