पीटीआय, लाहोर
पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी भारताशी मैत्रीसाठी आपल्यावर दबाव आणला होता, असा दावा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला.जनरल बाजवा यांनी टाकलेला दबाव हेही आमच्यामधील संबंध बिघडण्याचे एक कारण होते, अशी स्पष्टोक्ती इम्रान खान यांनी लाहोरमधील आपल्या निवासस्थानी समाज माध्यम पत्रकारांशी बोलताना केली. भारताने जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा पुन्हा बहाल केल्यावरच पाकिस्तानने चर्चा करावी अशी आपली भूमिका होती असे ते म्हणाले. जनरल बाजवा सहा वर्षे पाकिस्तानचे लष्करप्रमुख होते. ते नोव्हेंबर २०२२ मध्ये निवृत्त झाले. इम्रान खान पंतप्रधानपदावर असताना त्यांचे बाजवा यांच्याशी कधीही चांगले संबंध नव्हते.
जम्मू आणि काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे राहिले आहेत. दोन्ही देशांत शांततेबाबत पुन्हा चर्चा सुरू व्हावी, असे वाटत असेल तर पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवाव्यात आणि दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करावे, अशी शर्त भारताने ठेवली आहे.
इम्रान यांचा आरोप
जनरल बाजवा यांनी पाकिस्तानच्या बाबतीत जे वर्तन केले ते एखादा शत्रूही करणार नाही. लष्कराने त्यांना त्यासाठी धरले पाहिजे. बाजवा यांनी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली, तसेच माझी हत्या व्हावी अशी त्यांची इच्छा होती.