Ex PM Manmohan Singh Admitted To AIIMS In Delhi: देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार ९२ वर्षीय डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र रुग्णालयात दाखल करण्याचे कारण अद्याप कळलेले नाही.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही या वृत्ताला दुजोरा देणारी पोस्ट एक्सवर टाकली आहे. “डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीविषयी काळजी वाटते. त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवोत, अशी प्रार्थना करतो”, अशी पोस्ट त्यांनी एक्सवर टाकली आहे.
मनमोहन सिंग सध्या ९२ वर्षांचे आहेत आणि त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. ३३ वर्षे ते खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जाते. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते; जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते; जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. २००४ ते २०१४ असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते.
३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ साली डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. चार महिन्यातच त्यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली.