देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार हा मुस्लिमांचा असल्याचे मनमोहन सिंग यांनी सांगितलं होतं, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रचारादरम्यान केला होता. त्यांच्या या आरोपाला काँग्रेसनेही चोख प्रत्युत्तर दिलं होतं. दरम्यान, मोदींच्या या आरोपावर आता स्वत: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही दोन समुदायांमध्ये भेदभाव केला नाही, असं ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी मनमोहन सिंग यांनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी पंजाबमधील जनतेला मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहनही केले आहे.

मनमोहन सिंग यांनी पत्रात नेमकं म्हटलंय?

“निवडणूक प्रचारादरम्यान होणाऱ्या राजकीय चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप मी काळजीपूर्वक ऐकत होतो. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी अनेकदा द्वेषपूर्ण भाषणं केली. नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा खाली आणली आहे. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचे गांभीर्य कमी केलं आहे. यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी अशाप्रकारे भाषा वापरून एका विशिष्ट समजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलेला नाही. कोणीही अशाप्रकारे असंसदीय भाषा वापरली नाही”, अशी प्रतिक्रिया मनमोहन सिंग यांनी दिली.

मोदींच्या आरोपावरही दिली प्रतिक्रिया

पुढे ते म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी माझ्याबाबतही चुकीची विधाने केली. मी माझ्या आयुष्यात कधीही दोन समाजात भेदभाव केला नाही. अशा प्रकारे आरोप करायची भाजपाची जुनी सवय आहे.”

पंजाबमधील जनतेला मतदान करण्याचे आवाहन

या पत्रात त्यांनी पंजाबमधील जनतेला येत्या १ जून रोजी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहनही केलं. “मी पंजाबमधील जनतेला आवाहन करतो, त्यांनी १ जून रोजी घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करावं. मी तरुणांनाही विनंती करतो त्यांनी त्यांच्या भविष्यांसाठी मतदान करावं. केवळ काँग्रेस त्यांना त्यांच्या समृद्ध भविष्याची हमी देऊ शकते आणि देशातील संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करू शकते”, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले होते?

निवडणूक प्रचारादरम्यान राजस्थानच्या बन्सवाडा भागात मोदींची प्रचारसभा झाली होती. यावेळी त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. “आधी जेव्हा त्यांचं (काँग्रेस) सरकार होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार? ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार. तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जाणार का? तुम्हाला हे मान्य आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित जनतेला केला होता.

याशिवाय “काँग्रेसचा जाहीरनामाच हे सांगतोय की ते देशातील महिलांकडच्या सोन्याचा हिशोब घेतील आणि नंतर ती संपत्ती वाटून टाकतील. मनमोहन सिंग सरकारनं म्हटलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. हा शहरी नक्षलवादाचा विचार आपल्या महिलांकडचं मंगळसूत्रही वाचू देणार नाहीत”, असंही मोदी यावेळी म्हणाले होते.

२००६ मध्ये मनमोहन सिंग नेमकं काय म्हणाले होते?

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार २००६ मध्ये मनमोहन सिंग यांनी यासंदर्भातलं विधान केलं होतं. “देशाच्या विकासाची फळं एकसमान पद्धतीने अल्पसंख्यकांना, विशेषत: मुस्लिमांनाही मिळावीत यासाठी आपण कल्पक योजना राबवायला हव्यात. देशाच्या संसाधनांवर त्यांचा पहिला अधिकार असायला हवा”, असं मनमोहन सिंग म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former pm manmohan singh replied to narendra modi statement on muslim right on india property spb
Show comments