Sheikh Hasina on Hindu Priest Arrest: इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन)चे प्रमुख हिंदू नेत्याला बांगलादेशने अटक केली आहे. चिन्मय कृष्णा दास यांच्या अटकेवर भारतासह विविध स्तरातून टीका होत आहे. त्यात आता बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचीही भर पडली आहे. बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर शेख हसीना यांनी पलायन केले होते. त्यांनी एक निवेदन जाहीर करत हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्णा दास यांच्या अटकेचा आणि चितगाव येथे वकिलाचा खून झाल्याच्या घटनेचा निषेध केला आहे. चिन्मय कृष्णा दास यांना तात्काळ सोडण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मंगळवारी चितगावमधील न्यायालयाने राजद्रोहाच्या खटल्यात चिन्मय कृष्णा दास यांचा जामीन नाकारला, त्यानंतर हिंसक आंदोलन सुरू झाले. सुरक्षा दल आणि चिन्मय कृष्णा दास यांच्या अनुयायांमध्ये हिंसक संघर्ष उडाल्यानंतर सहाय्यक सरकारी वकील सैफुल इस्लाम यांचा खून झाला. शेख हसीना म्हणाल्या की, मी या हत्येचा तीव्र निषेध करत आहे. या हत्येमागे जे लोक आहेत, त्यांना कडक शासन झाले पाहीजे.
शेख हसीना पुढे म्हणाल्या, “सनातन धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरू यांना अन्यायकारक पद्धतीने अटक करण्यात आली आहे. त्याना तात्काळ मुक्त केले पाहीजे. चितगावमध्ये मंदिरे जाळली जात आहेत. याआधी अल्पसंख्याक समाज आणि अहमदीया समाजाची प्रार्थना स्थळे, त्यांची घरे, चर्च अशा अनेक वास्तू उध्वस्त करण्यात आल्या आहेत. अनेक वास्तूंमध्ये लुटालूट करण्यात आली. धार्मिक स्वातंत्र्य आणि सर्व समाजातील लोकांच्या जीवित आणि मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे.”
हे ही वाचा >> बांगलादेश पोलिसांनी दहशतवादी म्हणत ताब्यात घेतलेले इस्कॉनचे चिन्मय कृष्णा दास कोण आहेत?
बांगलादेशातील हिंदूंवरील वाढत्या हिंसाचाराच्या विरोधात आवाज उठवणारे हिंदू पुजारी आणि इस्कॉन धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांना मंगळवारी ढाका येथे अटक करण्यात आली. ढाक्याच्या उत्तरेस सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या रंगपूर शहरात हिंदू समुदायाच्या नेतृत्वाखाली मजबूत कायदेशीर संरक्षण आणि अल्पसंख्यांकांना समर्पित मंत्रालयाच्या मागणीसाठी निदर्शने सुरू होती. त्या अंतर्गतच ही अटक करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
चिन्मय कृष्णा दास ब्रम्हचारी कोण आहेत?
चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी सुरुवातीला चंदनकुमार धर या नावाने ओळखले जात होते. चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांना सोमवारी दुपारी ढाका विमानतळावरून अटक करण्यात आली, असे ‘एएनआय’ने वृत्त दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून, कृष्णा दास यांनी बांगलादेशमध्ये कथित सहभक्तांवरील अत्याचारचा निषेध करण्यासाठी अनेक रॅली काढल्या होत्या. ‘एएफपी’नुसार, कृष्णा दास प्रभू हे बांगलादेशातील प्रमुख हिंदू नेते आणि बांगलादेश संमिलितो सनातन जागरण जोते गटाचे सदस्य आहेत. कृष्णा दास प्रभू यांनी इस्कॉनचे प्रवक्ते म्हणूनही काम केले आहे. ते बांगलादेशातील हिंदू हक्कांसाठी कायम आपली भूमिका प्रखरतेने मांडत आले आहेत.