एपी, मिलवॉकी
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात सोमवारी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिनिधींनी जोरदार उत्साहात स्वागत केले, त्याच वेळी पक्षातर्फे त्यांच्या उमेदवारीची करण्यात आली. ट्रम्प शनिवारीच पेनसिल्व्हेनिया येथे एका सभेत हत्येच्या प्रयत्नातून बचावले होते. कानाला बँडेज बांधूनच ते अधिवेशनाला उपस्थित राहिले. आपल्या उमेदवारीची घोषणा झाल्यावर ट्रम्प यांनी ओहायोचे सिनेटर जे डी व्हान्स यांना आपले उपाध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून जाहीर केले.
ट्रम्प तिसऱ्यांचा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. पहिल्यांदा निवडणूक लढवली तेव्हा २०१६ साली ते विजयी झाले होते, तर मागील निवडणुकीत २०२० मध्ये ते पराभूत झाले होते. त्यांच्या उमेदवारीची घोषणा करताना, पक्षाचे अध्यक्ष मायकेल व्हॅटली म्हणाले की, ‘‘आपण एक पक्ष म्हणून एकत्र आले पाहिजे आणि एक देश म्हणूनही आपण एकत्र असले पाहिजे. आपण ट्रम्प यांच्यासारखेच सामर्थ्य आणि लवचीकता दाखवली पाहिजे आणि उत्कृष्ट भविष्यासाठी या देशाचे नेतृत्व केले पाहिजे.’’ मात्र, अध्यक्ष जो बायडेन आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांविषयी आपल्याला ममत्व वाटत नसल्याचेही व्हॅटली आणि अन्य नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>दोन आठवड्यांत उत्तर सादर करा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
डेमोक्रॅटिक पक्षाची धोरणे अमेरिकेसाठी, आपल्या संस्थांसाठी, आपली मूल्ये आणि आपली जनता यांच्यासाठी स्पष्टपणे धोकादायक आहेत अशी टीका विस्कॉन्सिनचे सिनेटर रॉन जॉन्सन यांनी केली. यावेळी काही प्रतिनिधींनी ‘‘लढाई, लढाई, लढाई’’ अशा घोषणा दिल्या.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ‘निशाणा साधण्याची’ इच्छा आहे हे आपले वक्तव्य चूक होते अशी कबुली अध्यक्ष जो बायडेन यांनी दिली. मात्र, आपले बोलणे केवळ प्रासंगिक होते असे ते म्हणाले.
व्हान्स यांचा भारतीय संबंध
जे डी व्हान्स हे अमेरिकी लेखक असून त्यांच्या पत्नी उषा चिल्लुकुरी व्हान्स भारतीय वंशाच्या आहेत. त्या पेशाने वकील आहेत. ट्रम्प विजयी झाल्यास त्या अमेरिकेच्या ‘सेकंड लेडी’ होतील. व्हान्स यांनी उपाध्यक्षपदाची उमेदवारी स्वीकारल्यानंतर उषा याही प्रकाशझोतात आल्या. सॅन डिएगो उपनगरात त्यांचे बालपण गेले. उषा यांनी येल लॉ स्कूलमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे त्या २०१४मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या नोंदणीकृत सदस्य होत्या.