राष्ट्रपती असताना मिळालेल्या व काही काळपर्यंत महाराष्ट्रातील त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या शाळेत ठेवण्यात आलेल्या भेटवस्तू माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपती भवनला परत केल्या आहेत.
राष्ट्रपती भवनातून माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार प्रतिभा पाटील यांना त्या राष्ट्रपती असताना १५५ भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्या तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या असलेल्या अमरावती येथील विद्याभारती शैक्षणिक मंडळ या संस्थेस प्रदर्शनार्थ देण्यात आल्या होत्या.
सुभाष अग्रवाल यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीनुसार या भेटवस्तूत ब्रिटिश पंतप्रधानांनी दिलेला मेणबत्ती संच, नेल्सन मंडेला यांनी दिलेली सुवर्ण व रजत पदके, चीनकडून मिळालेली भेट पेटी यांचा समावेश आहे. या सर्व वस्तू २२ मे रोजी राष्ट्रपती भवनला परत करण्यात आल्या आहेत. या सर्व वस्तू परत मिळाल्याचे राष्ट्रपती भवनच्या कला उपसंचालकांनी म्हटले असून, या भेटवस्तूंच्या वाहतुकीचा खर्च नोंदीत उपलब्ध नाही असे म्हटले आहे. या भेटवस्तू अमरावती येथील विद्याभारती शैक्षणिक मंडळास राष्ट्रपती भवन व ती संस्था यांच्यातील एका करारानुसार तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आल्या होत्या. एपीजे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती असताना त्यांनी ३६ कलावस्तू या संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजे डीआरडीओला नवी दिल्लीतील ब्राह्मोस केंद्रात प्रदर्शनार्थ ठेवण्यास दिल्या होत्या. त्या सर्व वस्तू ३ ऑक्टोबर २०१२ रोजी राष्ट्रपती भवनला परत मिळाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा