माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला केला. ‘‘तुम्ही स्वत:च्या चुका मान्य करून त्या सुधारण्याऐवजी लोकांच्या प्रत्येक समस्येला देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना दोषी ठरवत आहात’’, अशी तीव्र टीका मनमोहन सिंग यांनी केली.
पंजाबमधील ११७ जागांसाठी रविवारी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी पंजाबी भाषेत ९ मिनिटांची चित्रफीत प्रसिद्ध केली असून त्याद्वारे मतदारांना अप्रत्यक्षपणे संदेश दिला आहे. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मनमोहन सिंग यांचा समावेश केला जात असला तरी प्रकृतीच्या कारणास्तव ते क्वचितच जाहीर कार्यक्रमात सहभागी होतात. ‘देशातील परिस्थिती गंभीर असून करोनाच्या काळातील केंद्राच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे अर्थव्यवस्थेची दुरवस्था झाली आहे, लोकांना महागाई आणि बेरोजगारी सहन करावी लागत आहे. श्रीमंत आणखी श्रीमंत, गरीब आणखी गरीब होऊ लागले आहेत. साडेसात वर्षे सरकार चालवल्यानंतरही स्वत:च्या चुकांचे खापर पं. नेहरूंवर टाकले जात आहे’, असे मनमोहन सिंग म्हणाले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदींनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत पं. नेहरूंवर टीका केली होती. त्यासंदर्भात, ‘पंतप्रधान पदाला प्रतिष्ठा असते आणि इतिहासाला दोषी ठरवून तुमचे गुन्हे कमी होत नाहीत. काँग्रेसने राजकीय लाभासाठी देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न केला नाही. सत्य लपवले नाही. जगासमोर पंतप्रधान म्हणून मी कधीही देशाच्या प्रतिष्ठेला धक्का लागू दिला नाही’, असे सिंग म्हणाले. गेल्या महिन्यात सुरक्षेचे कारण देत मोदी पंजाबचा दौरा पूर्ण न करताच दिल्लीला परतले होते. त्याचा संदर्भ देत सिंग यांनी मोदींना लक्ष्य केले. पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी आणि पंजाबमधील जनतेला बदनाम केले गेले. शेतकरी आंदोलनादरम्यान ‘पंजाबियत’चाही अपमान केला, अशी टीका सिंग यांनी केली.
माझ्यावर आरोप करणाऱ्यांचे पितळ उघड
मौनमोहन, कमकुवत पंतप्रधान, भ्रष्टाचारी असे खोटे आरोप करणाऱ्या भाजप आणि त्यांच्या ‘ब’ आणि ‘क’ चमूंच्या दुष्प्रचारांचे पितळ लोकांसमोर उघडे पडले आहे. आता लोक २००४ ते २०१४ या काळातील काँग्रेसप्रणित सरकारच्या लोकोपयोगी कामांची आठवण काढत आहेत.. मी १० वर्षे पंतप्रधानपद भूषवले, पण बोलण्यापेक्षा काम करण्याला अधिक प्राधान्य दिले, असे आक्रमक प्रत्युत्तर सिंग यांनी दिले.
‘फोडा, राज्य करा; हेच धोरण’
राजकीय स्वार्थासाठी लोकांना जातीच्या-धर्माच्या नावाखाली, प्रांता-प्रांतात भेद निर्माण करून फूट पाडली जात आहे. लोकांना एकमेकांमध्ये लढवले जात आहे. मोदी सरकारचा राष्ट्रवाद बनावट आणि पोकळ आहे इतकेच नव्हे, तर धोकादायकही आहे. फोडा आणि राज्य करा, या ब्रिटिश नितीवर ‘राष्ट्रवाद’ टिकलेला आहे. लोकशाहीवर मोदी सरकारचा विश्वास नसून घटनात्मक संस्था कमकुवत केल्या जात आहेत, अशी टीकाही सिंग यांनी केली.
‘बिर्याणी खाऊन परराष्ट्र संबंध सुधारत नाहीत’
लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनची घुसखोरी दडपण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचा आरोपही सिंग यांनी केला. नेत्यांना बळजबरीने मिठी मारून, झुल्यांवर झुलवून वा बिर्याणी खाऊन परराष्ट्र संबंध सुधारत नाहीत, ही बाब आता पंतप्रधान मोदींना एव्हाना समजली असेल. चेहऱ्याला मुलामा लावून मूळ स्वभाव बदलत नाही. सत्य कधी ना कधी बाहेर येते. मोठमोठय़ा गप्पा मारणे सोपे असते, त्या प्रत्यक्षात आणणे कठीण असते, हेही केंद्र सरकारला समजले पाहिजे, असा टोमणा सिंग यांनी मारला.