भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाचं भाकित ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी दहा वर्षांपूर्वीच वर्तवलेलं होतं. “या कठिण काळात आमचं नेतृत्व करण्यासाठी ऋषी सुनक यांचे मी अभिनंदन करतो. मी दशकभराआधीच भाकित केलं होतं की हुजूर पक्ष पहिल्या ब्रिटिश भारतीय पंतप्रधानाची निवड करेल. हे भविष्य प्रत्यक्षात उतरताना पाहून अभिमान वाटत आहे. ऋषी यांना माझा मनापासून पाठिंबा आहे”, असे ट्वीट डेव्हिड कॅमेरॉन यांनी केलं आहे.
“महिला पंतप्रधान(मिसेस मार्गारेट थॅचर) असणारा आमचा पहिला पक्ष आहे. ज्यू वंशाचे पंतप्रधानही आमच्याच पक्षाचे होते. आमच्या पक्षात असलेली प्रतिभा पाहता मूळ भारतीय असलेली व्यक्ती ब्रिटिश पंतप्रधान होईल, असं मला वाटतं”, अशा आशयाचं विधान कॅमेरॉन यांनी ‘कॉन्झर्व्हेटिव्ह फ्रेंड्स ऑफ इंडिया’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केलं होतं. कुटुंबाची काळजी घेणं, हे मुल्य हुजूर पक्ष आणि ब्रिटिश भारतीयांमध्ये समान असल्याचंही ते म्हणाले होते. ब्रिटन आज जे काही आहे, त्यासाठी ब्रिटिश भारतीयांनी अथक प्रयत्न केल्याचे गौरवोद्गारही त्यांनी या कार्यक्रमात काढले होते.
सुनक हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षांतले पाचवे पंतप्रधान आहेत, शिवाय ते माजी अर्थमंत्रीही आहेत. पंतप्रधानपदासाठी सत्ताधारी हुजूर पक्षात पेनी मॉरडाँट आणि ऋषी सुनक यांच्यात शर्यत होती. हुजूर पक्षाच्या ३५७ खासदारांपैकी सुनक यांना १४२ जणांनी पाठिंबा दिला होता, तर मॉरडाँट यांच्याकडे २९ सदस्यांचे पाठबळ होते. नेतेपदी निवड होण्यासाठी आवश्यक असलेला किमान १०० खासदारांचा पाठिंबा मिळणे अशक्यप्राय असल्याचे लक्षात येताच मॉरडाँट यांनी माघार घेतली आणि हुजूर पक्षाचे नवे नेते म्हणून सुनक यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या यशाचं जगभरातील भारतीयांकडून कौतुक केलं जात आहे.