पंजाबजे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होऊ शकतात. विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या जागी आता अमरिंदर सिंह यांची वर्णी लागू शकते, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केले आहे. भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या इतिहासातले सर्वात चर्चित राज्यपाल आहेत, कोश्यारी आता राजीनामा देण्याच्या मूडमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. कारण तीन दिवसांपूर्वी राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कोश्यारी यांची नुकतीच मुंबईत भेट झाली होती. या भेटीदरम्यान, कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता अशी बातमी येत आहे की, कोश्यारींच्या जागी राज्याचे नवे राज्यपाल म्हणून अमरिंदर सिंह यांच्या नावाची वर्णी लागू शकते. परंतु याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
भगतसिंह कोश्यारी हे सप्टेंबर २०१९ पासून महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर आहेत. मात्र सातत्याने ते वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी असो, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्या असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि मुंबईतल्या मराठी माणसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं असो, ते सातत्याने विरोधकांच्या निशाण्यावर राहिले आहेत.
हे ही वाचा >> Republic Day: पहिल्यांदाच नऊ राफेल विमानांची प्रात्यक्षिकं, जाणून घ्या आणखी खास काय काय घडलं?
अमरिंदर सिंह यांच्या पक्ष भाजपात विलीन
दुसऱ्या बाजूला अमरिंदर सिंह हे काही काळापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री होते. परंतु मार्च २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांना काँग्रेस हाय कमांडकडून पदावरून हटवण्यात आलं होतं. त्यानंतर निवडणुकीपूर्वी सिंह यांनी पंजाब लोक काँग्रेस नावाने स्वतःच्या नवीन पक्षाची स्थापना केली होती. काही काळाने त्यांनी आपला पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन केला.