India Pakistan Tensions Updates: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानचा तीव्र निषेध केला जात आहे. भारत सरकारनं पाकिस्तानचा या हल्ल्यात सहभाग असल्याचं नमूद करत पाकिस्तानवर कठोर निर्बंध लादले. पण त्याचवेळी भारताच्या काही भागांत काश्मिरी नागरिकांना निघून जाण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पहलगाम हल्ल्यातील जखमींना वाचवून सुरक्षित बेस कॅम्पला आणणाऱ्या काश्मिरी नागरिकांचे दाखल दिले जात आहेत. या सर्व मुद्द्यांवर काश्मीरमधील माजी फुटीरतावादी नेते बिलाल गनी लोन यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.

एएनआयवर स्मिता प्रकाश यांच्या पॉडकास्टमध्ये बिलाल गनी लोन यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या या पॉडकास्टमध्ये बिलाल गनी यांना हा हल्ला, यानंतर काश्मीरमधील परिस्थिती, काश्मीर प्रश्नावरचा तोडगा, काश्मिरींना लक्ष्य केलं जाणं आणि भारत व पाकिस्तान यांच्यातील युद्धाबाबत विचारणा केली गेली. यावर गनी यांनी पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांशी काश्मिरी मुस्लिमांचा काहीही संबंध नसल्याचं नमूद केलं.

“काश्मिरींना माणूस म्हणून जगू द्या”

“हा फक्त काश्मीरचा मुद्दा नाही. हा फार मोठा मुद्दा आहे. मला बलुचिस्तान वगैरेशी काही देणं-घेणं नाही. माझ्यासाठी काश्मीर महत्त्वाचं आहे. माझी इच्छा आहे की काश्मिरींना तुम्ही माणूस म्हणून जगू द्या. त्याला हवं तसं जगू द्या. जे दहशतवादी आहेत, त्यांना तुम्ही अशी शिक्षा द्या, जी त्यांच्या पुढच्या ५० पिढ्या लक्षात ठेवेल. पण तुम्ही सगळ्या काश्मिरींना यात मोजू नका”, असं बिलाल गनी म्हणाले.

बिलाल गनी यांनी दिला सहजीवनाचा नारा

दरम्यान, यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना बिलाल गनी लोन यांनी काश्मिरी जनता आता सहजीवनाच्या दिशेनं प्रयत्न करत असल्याचं नमूद केलं. “काश्मिरी नागरिकांमध्ये दिल्लीवाल्यांपेक्षा जास्त प्रगल्भता आहे. तुम्हाला काश्मीरबद्दल गैरसमज आहे. आम्हाला भूतकाळही होता, आम्हाला वर्तमानकाळही आहे आणि आमचा भविष्यकाळही असेल. काश्मिरींनी लढून पाहिलंय खूप. आता ते अशा निष्कर्षावर आलेत की जर आपल्याला व्यवस्थेमध्ये राहायचं असेल, तर आपल्याला एकत्र राहावं लागेल. त्याला जगू दिलं पाहिजे”, असं ते म्हणाले.

“ज्या दिवशी काश्मीरमध्ये कट्टरतावाद पसरेल, तेव्हा सगळ्यात आधी मी मरेन. आम्ही कट्टरतावादी नाही. आम्ही चांगले मुस्लीम आहोत. जेव्हा जेव्हा कट्टरवाद पसरतो, तेव्हा आमच्यासारख्या लोकांना त्रास सहन करावा लागतो. आधुनिक मुस्लीम होणं कठीण आहे”, असंही ते म्हणाले.

“आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही”

दरम्यान, बिलाल गनी लोन यांनी पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांशी काश्मिरी जनतेचा काहीही संबंध नसल्याचं नमूद केलं. “पहलगाममध्ये हल्ला करणारे आमचे प्रेषित नव्हते. आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नव्हता. तिथे तर काश्मिरींनीच पर्यटकांना वाचवून खाली आणलं. सुरक्षा पथक तर नंतर संध्याकाळी पोहोचलं. यात आम्ही काही मोठं काम केलेलं नाही. प्रत्येक समाजानं आजवर हेच केलं आहे. पण माध्यमांनी मात्र लगेच हिंदू-मुस्लीम सुरू केलं”, अशी खंत बिलाल गनी यांनी बोलून दाखवली.

“अशा ठिकाणी पर्यटकांना पाठवलंच का?”

बैसरण खोऱ्यात जाण्यासाठी रस्ता योग्य नव्हता, तरी तिथे पर्यटकांना का पाठवलं? असा सवाल बिलाल गनी यांनी केला आहे. “ते आले आणि निघून गेले. १५ मिनिटांचा सगळा खेळ झाला. त्या १५ मिनिटांत जितक्या लोकांना वाचवता आलं, तेवढ्यांना वाचवलं. सगळ्यात आधी प्रशासनानं हे सांगायला हवं की पर्यटकांना तिथे का पाठवलं? रस्ता व्यवस्थित नव्हता, माती होती, पाणी होतं. तो एक मृत्यूचा सापळा होता. आणि आपण त्या सापळ्यात सापडलो”, असं गनी म्हणाले.