काँग्रेस पक्षाचे माजी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण या सर्व चर्चांना गुलाम नबी आझाद यांनी तूर्तास पूर्णविराम दिला आहे. आपण जम्मू काश्मीरमध्ये स्वत:चा राजकीय पक्ष काढणार असल्याचं आझाद यांनी जाहीर केलं आहे. याबाबतचं वृत इंडिया टुडेनं दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत अधिक माहिती देताना आझाद यांनी सांगितलं की, “मी जम्मू-काश्मीरला जाणार आहे. मी राज्यात माझा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणार आहे. त्यानंतर संबंधित पक्ष राष्ट्रीय स्तरावर आणण्याबाबत चाचपणी करू.” आझाद यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. अलीकडच्या काही महिन्यांत अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यामुळे हा काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा- आझाद यांचा राजीनामा अत्यंत दुर्दैवी! पत्राची वेळ आणि तथ्यही चुकीची, राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षाचं प्राथमिक सदस्यत्वही त्यांनी सोडलं आहे. १६ ऑगस्टला त्यांनी जम्मू काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा देत आपल्या नाराजीचे संकेत दिले होते. त्यानंतर अखेर आता त्यांनी राजीनामा देत पक्षाला मोठा धक्का दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांना चार पानांचं पत्र पाठवत राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा- काँग्रेसला मोठा धक्का! गुलाम नबी आझाद बंडखोरीच्या तयारीत? नियुक्तीनंतर काही तासातच राजीनामा

राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आणि खासकरुन जानेवारी २०१३ मध्ये त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर याआधी असलेली सल्लागार यंत्रणा पूर्णपणे नष्ट करण्यात आली असा आरोप त्यांनी पत्रात केली आहे. तसंच पक्षाच्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारुन कोणताही अनुभव नसणारे पक्षाचं कामकाज चालवू लागले असंही ते म्हणाले आहेत.

राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला हे फारच बालिशपणाचं होतं अशी टीका करताना २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवात याचा मोठा वाटा होता असा दावा त्यांनी केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former senior congress leader gulam nabi azad will form new party in jammu kashmir after exit from congress rmm