आंध्र प्रदेशच्या माजी विधानसभा अध्यक्षांच्या खासगी कार्यालयात गुरुवारी चोरीचा प्रकार घडला. यावेळी चोरट्यांनी कार्यालयातील दोन कॉम्प्युटर्स चोरून नेले, विशेष म्हणजे या नेत्याने हे कॉम्प्युटर्स आपल्या शासकीय कार्यालयातून अवैधरित्या आपल्या खासगी कार्यालयात नेले होते.

कोडेला शिवप्रसाद राव असे या माजी विधानसभा अध्यक्षाचे नाव आहे. गुंटूर जिल्ह्यातील सत्तेनापल्ली येथील त्यांच्या राहत्या घराजवळील खासगी कार्यालयात गुरुवारी चोरी झाली. आंध्र प्रदेशातील त्यांचे सरकारी कार्यालय अमरावती या नव्या राजधानीच्या शहरात शिफ्ट झाले त्यावेळी त्यांनी आपल्या सरकारी कार्यालयातील दोन कॉम्प्युटर अवैधरित्या आपल्या खासगी कार्यालयात नेले होते.

दरम्यान, सध्या सत्तेत असलेल्या वायएसआर काँग्रेस सरकारने राव यांच्यावर चोरीचा आरोप केला आहे. राव यांनी सरकारी कार्यालयातील डझनभर प्लास्टिकच्या खुर्च्या, सोफासेट, कॉम्प्युटर्स आणि इतर वस्तू चोरल्याचे सरकारने म्हटले आहे. यावर स्पष्टीकरण देताना राव यांनी म्हटले की, सरकारी कार्यालयात पुरेशी जागा नसल्याने या वस्तू चोरीला जाण्याची किंवा खराब होण्याची शक्यता होती. त्यामुळे जोपर्यंत अमरावती येथील वेलागपुडी येथे नवे कार्यालय तयार होत नाही तोपर्यंत ते माझ्या खासगी कार्यालयात ठेवण्यात आले. यासंदर्भात मी विधानसभा सचिवांना पत्र लिहून माहिती दिली आहे. यामध्ये हे साहित्य मी परत करेन किंवा त्याचा जो काही खर्च असेल तो देईन असे म्हटले होते. मात्र, यावर मला अद्याप त्यांचे उत्तर आलेले नाही.

यावर वायएसआर काँग्रेसचे आमदार सत्तेनापल्ली अंबाती रामाबाबू यांनी म्हटले की, राव हे खोट बोलत आहेत. गेल्या सरकारमध्ये पाच वर्षे विधानसभा अध्यक्षपदी कार्यरत असताना त्यांनी हे साहित्य परत का केले नाही. मुळात त्यांनी सरकारी मालमत्ता आपल्या खासगी कार्यालयात नेलीच कशी? असा सवालही त्यांनी केला आहे.

Story img Loader