दिल्लीमधील चांदणी चौकचे खासदार आणि भाजपाचे वरिष्ठ नेते डॉ. हर्षवर्धन यांनी राजकारणाला राम राम ठोकून निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने त्यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. शनिवारी भाजपाने दिल्लीतील पाच लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये चांदणी चौक येथून प्रवीण खंडेलवाल यांना तिकीट देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. हर्षवर्धन हे याच मतदारसंघातून पाच वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांनी केंद्रीय आरोग्य आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम केले होते. आपल्या एक्स अकाऊंवर भली मोठी पोस्ट लिहून डॉ. हर्षवर्धन यांनी या निर्णयाची माहिती दिली. तसेच राजकारणातून बाजूला झाल्यानंतर पूर्व दिल्लीच्या कृष्णा नगर भागात असलेल्या आपल्या दवाखान्यावर लक्ष देणार असून कान-नाक-घसा तज्ज्ञ म्हणून वैद्यकीय सेवा देण्याचे काम करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

भाजपाला धक्का; उमेदवारी जाहीर केल्यानंतर भोजपुरी अभिनेते पवन सिंह यांची निवडणुकीतून माघार

डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या दीर्घ पोस्टमध्ये लिहिले की, तीस वर्ष माझी अतिशय सुरेख अशी राजकीय कारकिर्द राहिली. पाच वेळा विधानसभा आणि दोन वेळा लोकसभा निवडणुकीत मला मोठ्या फरकाने लोकांनी जिंकून दिलं. या काळात पक्षात आणि सरकारमध्ये महत्त्वाची पदे भूषविण्याची संधी मला मिळाली. आता मी यातून बाहेर पडत असून पुन्हा एकदा माझ्या मूळ कामाला मी जात आहे.

डॉ. हर्षवर्धन पुढे लिहितात, कानपूरच्या जीएसव्हीएम वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासून मी गरिबांना आणि गरजूंना मदत करणे, हेच माझे ध्येय ठेवले. तत्कालीन राष्ट्रीय स्वंयसेवक संघातील नेतृत्वाच्या आग्रहामुळे मी राजकारणात प्रवेश केला होता.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू नाहीत कारण..”, लालूप्रसाद यादव यांनी केला मोठा दावा!

मी शेवटपर्यंत संघ कार्यकर्ता

“मी एक स्वंयसेवक आहे. शेवटच्या माणसापर्यंत सेवा पोहोचली पाहीजे, या पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या अंतोदय तत्त्वज्ञानाने भारावून जात आजवर मी कार्यरत राहिलो. तेव्हाच्या आरएसएसच्या नेत्यांनी मला राजकारणात येण्याची समजूत घातली, म्हणून मी निवडणुकीला उभा राहिलो. राजकारण म्हणजे आपल्या तीन प्रमुख शत्रूंशी लढण्याचे एक साधन आहे, अशी माझी समजूत घालण्यात तेव्हा ते नेते यशस्वी ठरले. गरीबी, रोग आणि अज्ञान हे मानवाचे तीन प्रमुख शत्रू आहेत, असे मी मानतो”, अशी भावना डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केली.

कोण आहेत प्रवीण खंडेलवाल?

डॉ. हर्षवर्धन यांच्या ऐवजी ज्यांना उमेदवारी दिली, ते प्रवीण खंडेलवाल हे व्यावसायिक असून अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (CAIT) ते सरचिटणीस आहेत. खंडेलवाल यांनी जीएसटी परिषदेतही काम केलेले आहे. विदेशी ई-कॉमर्स कंपन्यामुळे स्थानिक बाजारातील व्यापाऱ्यांना नुकसान होत असल्याचा मुद्दा त्यांनी मधल्या काळात उचलून धरला होता. भाजपा दिल्लीचे ते माजी खजिनदारही राहिले आहेत.