माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांची कबुली; ‘एक्सप्रेस’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब
केंद्र सरकारला पूर्वकल्पना न देता लष्कराच्या दोन मोठय़ा तुकडय़ा १६ जानेवारी २०१२ च्या रात्री राजधानी नवी दिल्लीच्या रोखाने मार्गक्रमणा करत असल्याबद्दलची द इंडियन एक्स्प्रेसने दिलेली बातमी दुर्दैवी असली तरी खरी होती, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केला आहे.
माजी प्रधान माहिती अधिकारी आय. राममोहन राव यांच्या ‘क्रॉनिकल्स ऑफ ए कम्युनिकेटर’ या पुस्तकाचे तिवारी यांच्या हस्ते शनिवारी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे प्रकाशन झाले. त्या प्रसंगी एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. ती घटना घडली त्या काळात म्हणजे ऑक्टोबर २०१२ ते मे २०१४ दरम्यान तिवारी तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री होते. तसेच संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीचे सदस्यही होते.
द इंडियन एक्स्प्रेसने ४ एप्रिल २०१२ च्या अंकात ‘द जॅन्युअरी (जानेवारी) नाइट रईसाना हिल वज स्पुक्ड: टू की आर्मी युनिट्स मुव्ह्ड टोवर्ड्स देल्ही विदाऊट नोटिफाईंग गव्हर्नमेंट’ या मथळ्याने बातमी दिली होती. या वृत्तात एक्स्प्रेसने म्हटले होते की, १६ जानेवारीच्या रात्री (म्हणजे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग त्यांच्या जन्मतारखेच्या वादावरून सर्वोच्च न्यायालयात गेले त्या दिवशी) ३३ आर्मर्ड डिव्हिजनमधील हिसार येथे तैनात असलेली यांत्रिक पायदळाची एक महत्त्वाची तुकडी आणि आग्रा येथील एअरबोर्न ५० पॅरा ब्रिगेडचा (हवाई छत्रीधारी सैनिक) मोठा हिस्सा नवी दिल्लीच्या रोखाने आगेकूच करत असल्याची माहिती गुप्तहेर खात्यांनी दिली होती. मात्र इतक्या मोठय़ा लष्करी हालचालींची केंद्र सरकारला काहीच कल्पना दिलेली नव्हती. तशी ती देणे नियमांनुसार आवश्यक होते. त्यामुळे ही लष्करी उठावाची तयारी होती असे त्या बातमीतून अप्रत्यक्षरीत्या सुचवले गेले होते.
तिवारी यांनी प्रेक्षकांमधून या प्रसंगाविषयी प्रश्न विचारला गेला असता त्यांनी सांगितले की, मी त्यावेळी संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीचा सदस्य होतो आणि ते वृत्त खरे होते. मला खात्रीलायक सूत्रांनी ती बातमी खरी असल्याचे सांगितल्यामुळेच मी वृत्तपत्रावरील त्या कारवाईला विरोध केला, असे तिवारी यांनी म्हटले.

Story img Loader