अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना करोनाची लागण झाली आहे. ओबामा यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. काही दिवसांपासून घसा खवखवत असल्याने आपण करोना चाचणी केल्याचं त्यांनी सांगितलं, तसंच आपली पत्नी मिशेलचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचंही त्यांनी सांगितलं.
आपल्या ट्वीटमध्ये ओबामा म्हणतात, “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काही दिवसांपासून घसा खवखवत आहे, पण इतर काही लक्षणं नाहीत. लसीकरणाचे दोन्ही डोस त्यासोबतच बूस्टर डोसही मिळाल्याने आम्ही कृतज्ञ आहोत. मिशेलची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. लसीकरणाबद्दल जनतेला प्रोत्साहन देताना ओबामा म्हणतात, तुम्ही जर लसीकरण करून घेतले नसेल तर लवकरात लवकर लसीकरण करून घ्या. करोना रुग्णसंख्या घटत असली तरीही लस घेणं गरजेचं आहे .
ओबामा यांच्या या ट्वीटनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्वीटमध्ये मोदी म्हणतात, करोनामधून तुम्ही लवकर बरे व्हावे यासाठी माझ्या शुभेच्छा तसंच तुमच्या परिवाराच्या आरोग्यासाठीही शुभेच्छा.
अमेरिकेत आत्तापर्यंत सर्वाधिक करोना रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. आत्तापर्यंत अमेरिकेत ७९ दशलक्षाहून अधिक रुग्ण आढळले असून ९ लाख ६७ हजार मृत्यू झाले आहेत.