पीटीआय, वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी (३९वे) अध्यक्ष जिमी कार्टर यांचे रविवारी निधन झाले. कार्टर कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार जॉर्जियामधील प्लेन्स येथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात जॅक, चिप, जेफ आणि अॅमी ही चार मुले, ११ नातवंडे आणि १४ पतवंडे आहेत. त्यांची पत्नी रोझलिन १९ नोव्हेंबर २०२३ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी मरण पावल्या. त्याशिवाय एका नातवाचा त्यांच्या हयातीतच मृत्यू झाला होता.
जिमी कार्टर यांच्या पार्थिवावर ९ जानेवारीला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील असे अध्यक्षांच्या कार्यालयाने जाहीर केले. त्यांच्यावर फेब्रुवारी २०२३पासून राहत्या घरीच उपचार सुरू होते. त्यापूर्वी त्यांना काही काळ रुग्णालयात दाखल करावे लागले होते. जिमी कार्टर १ ऑक्टोबरला १०० वर्षांचे झाले होते. ते अमेरिकेचे सर्वाधिक आयुष्य लाभलेले अध्यक्ष होते. जिमी कार्टर हे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते होते. ते १९७७ ते १९८१ या कालावधीत अमेरिकेचे अध्यक्ष होते. पदावर असताना भारताचा दौरा केलेले ते तिसरे अध्यक्ष होते. त्यांच्या नावावरून हरियाणातील एका गावाचे नाव कार्टरपुरी ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा : Kurmi Mahakumbh : अयोध्येतील कुर्मी महाकुंभाचं आयोजन हे पोटनिवडणुकीभोवती कसं फिरतं आहे?
कार्टर यांनी साठ वर्षांपेक्षा जास्त काळ करुणा आणि स्पष्ट नैतिकतेने रोगांचे उच्चाटन, शांतता, नागरी हक्क व मानवाधिकारांची प्रगती, मुक्त व निष्पक्ष निवडणुकांना चालना, बेघरांसाठी घरे आणि सर्वात अखेरच्या व्यक्तीचा कैवार यासाठी काम केले. त्यांनी जगभरात लोकांना दारिर्द्याबाहेर काढले आणि त्यांचे आयुष्य बदलले.
जो बायडेन, अध्यक्ष, अमेरिका
ते थोर द्रष्टे नेते होते. जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी त्यांनी अथकपणे काम केले. भारत-अमेरिका संबंध दृढ करण्यासाठी त्यांचे योगदान चिरस्मरणात राहील.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान