पीटीआय, वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर हे भारताचे मित्र मानले जात. आणीबाणी हटवल्यानंतर आणि १९७७मध्ये जनता पक्षाने सरकार स्थापन केल्यानंतर भारताला भेट देणारे ते अमेरिकेचे पहिले अध्यक्ष होते. त्यावेळी संसदेसमोर केलेल्या भाषणामध्ये त्यांनी हुकूमशाहीविरोधात भाष्य केले होते. २ जानेवारी १९७८ रोजी केलेल्या या भाषणात ते म्हणाले होते, ‘‘भारतासमोरील संकटांचा आम्हीही अनेकदा सामना केला आहे, ती संकटे सामान्यत: विकसनशील जगाची आहेत. आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे, त्याचा अंदाज त्यातून आपल्याला येतो. त्यासाठी हुकूमशाही हा मार्ग नाही. मात्र, भारताचे यश महत्त्वाचे आहे.’’
कार्टर सेंटरमधील नोंदींनुसार, संसदेतील भाषणाच्या दुसऱ्या दिवशी ३ जानेवारी १९७८ रोजी रोझलिन आणि जिमी कार्टर यांनी नवी दिल्लीपासून तासाभराच्या अंतरावरील दौलतपूर नसिराबाद या गावाला भेट दिली. तोपर्यंत भारताला भेट देणारे कार्टर हे केवळ तिसरे आणि भारताशी वैयक्तिक संबंध असणारे ते पहिलेच अध्यक्ष होते. त्यांची आई लिलियन यांनी १९६०च्या दशकामध्ये पीस कोअरच्या माध्यमातून आरोग्य स्वयंसेवक म्हणून काम केले होते. या भेटीनंतर तेथील गावकऱ्यांनी कार्टर यांच्या सन्मानार्थ आपल्या गावाचे नाव कार्टरपुरी असे केले होते.
हेही वाचा : अग्रलेख : बडे बेआबरू होकर…
लोणावळ्यातील बेघरांसाठी घरे
मुंबई : जिमी कार्टर यांचा मुंबई आणि लोणावळ्याशी जवळचा संबंध होता. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की त्यांची परिचारिका आई लिलियन यांनी ६७व्या वर्षी पीस कोअर या संस्थेबरोबर काम करायला सुरुवात केली होती. त्या विक्रोळीमध्ये आरोग्य स्वयंसेवक म्हणून काम करत असत. खुद्द जिमी यांनी २००६मध्ये लोणावळ्याच्या अल्प-उत्पन्न गटातील १०० कुटुंबांसाठी जवळच्याच पाटण येथे घरे बांधली होती. बेघरांना घरे मिळवून देण्याच्या उद्देशाने २००६च्या ऑक्टोबर महिन्यात जिमी कार्टर आणि त्यांची पत्नी रोझलिन हे एक आठवडाभर स्वत: राबत होते. त्यांच्या जोडीला लाभार्थी कुटुंबे आणि जवळपास दोन हजार आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक स्वयंसेवक होते. या स्वसंयेवकांमध्ये हॉलिवडूचा अभिनेता ब्रॅड पिट आणि हिंदी चित्रपट अभिनेता जॉन अब्राहम यांचा समावेश होता. हॅबिटाट फॉर ह्युमानिटी या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ही घरे बांधण्यात आली.
अध्यक्ष म्हणून आव्हानांचा सामना
अध्यक्षपदाच्या उत्तरार्धात घसरणारी अर्थव्यवस्था कार्टर यांच्यासाठी तापदायक ठरली होती. त्याच काळात सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानात फौजा घुसवल्या आणि पुढे रशियन सैन्य तिथे दशकभर राहिले. ४ नोव्हेंबर १९७९ रोजी इराणचे धार्मिक नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांना आपला सर्वोच्च नेता मानणारे विद्यार्थी तेहरानमधील अमेरिकेच्या दूतावासात घुसले आणि त्यांनी ५२ अमेरिकी नागरिकांना ओलीस धरले. हे ओलीसनाट्य त्यांच्या अध्यक्षपदाचे ४४४ दिवस सुरू होते. त्यामध्येच त्यांच्या अध्यभपदाचे अखेरचे दिवस गेले.
जगभरातून शोकसंदेश
कार्टर यांच्या निधनानंतर अमेरिका आणि जगभरातून शोकसंदेश आले. आज अमेरिकेने आणि जगाने एक अभूतपूर्व नेता, मुत्सद्दी आणि मानवतावादी नेता गमावला आहे, अशा शब्दांमध्ये विद्यामान अध्यक्ष जो बायडेन यांनी कार्टर यांना श्रद्धांजली वाहिली. तर उत्तम चारित्र्य, धैर्य, आशा आणि आशावाद हे त्यांचे गुण होते अशी प्रतिक्रिया फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडेन यांनी व्यक्त केली.
जिमी कार्टर यांनी अमेरिकेच्या सुधारणेसाठी खूप काम केले. त्यासाठी मी त्यांचा आदर करतो. ते खरोखर चांगली व्यक्ती होते आणि अर्थातच त्यांची खूप आठवण येईल. अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतरही ते कालबाह्य झाले नाहीत.
डोनाल्ड ट्रम्प, नियोजित अध्यक्ष, अमेरिका
इजिप्त आणि इस्रायलदरम्यान शांतता करारासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची होती आणि ती इतिहासात कायमची नोंदवली जाईल.
आब्देल फताह अल-सिसी, अध्यक्ष, इजिप्त
कार्टर यांच्या नेतृत्वाने कॅम्प डेव्हिड करार आणि पनामा कालवा करारांसह जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी लक्षणीय योगदान दिले. दुबळ्यांबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी, त्यांचा सफाईदारपणा आणि सर्वांच्या भल्यावर असणारा त्यांचा विश्वास यासाठी ते लक्षात राहतील.
अँटोनियो गुटेरेस, सरचिटणीस, संयुक्त राष्ट्रे
माझे वडील नायक होते. केवळ माझ्यासाठी नव्हे तर शांतता, मानवाधिकार आणि निस्वार्थ प्रेम यावर विश्वास असलेल्या प्रत्येकासाठी.
चिप कार्टर, जिमी कार्टर यांचा मुलगा
अल्पचरित्र
● १ ऑक्टोबर १९२४ – जन्म
● वडील जेम्स कार्टर शेतकरी, आई लिलियन परिचारिका
● १९४३मध्ये अमेरिकेच्या नौदल अकादमीमध्ये (युनायटेड स्टेट्स नेव्हल अकादमी) छात्रसैनिक
● अटलांटिक आणि प्रशांत महासागरांमधील जहाजांच्या ताफ्यावर काम
● प्रतिष्ठित आण्विक पाणबुडी उपक्रमासाठीही निवड
● १९६२ – स्टेट सेनटवर निवड
● १९७० – जॉर्जियाचे ७६वे गव्हर्नर
हेही वाचा : Kurmi Mahakumbh : अयोध्येतील कुर्मी महाकुंभाचं आयोजन हे पोटनिवडणुकीभोवती कसं फिरतं आहे?
● १९७४ – अध्यक्षपदासाठी प्रचाराला सुरुवात
● तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा वॉटरगेट प्रकरणी १९७४मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा
● १९७६ – गेराल्ड फोर्ड यांचा पराभव करून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी
● १९७७ – अमेरिकेचे ३९वे अध्यक्ष म्हणून शपथविधी
● १९८० – दुसऱ्यांदा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या रोनाल्ड रेगन यांच्याकडून पराभव
● पराभवानंतर शांतता, पर्यावरण आणि मानवाधिकारांसाठी अथक प्रयत्न
● २००२ – शांततेसाठी नोबेल पुरस्काराने गौरव