२०१४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये केंद्रातील सत्ताधारी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी सांभाळणार आहेत. राहुल गांधी यांच्याकडे लवकरच काँग्रेस पक्षाची मोठी जबाबदारी सोपविली जाणार असल्याची माहिती सोमवारी पक्षाचे प्रवक्ते पी. सी. चाको यांनी दिली. राहुल गांधी यांना पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळण्याची शक्यता असून पक्षाची सूत्रे सोनिया गांधी यांच्याकडेच राहण्याची चिन्हे आहेत.
राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षात मोठी भूमिका स्वीकारावी, अशी पक्ष कार्यकर्त्यांंकडून सातत्याने मागणी होत होती. सुरुवातीला अशी जबाबदारी स्वीकारण्यास राहुल गांधी तयार नव्हते. पण आता ते राजी झाले आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये तेच यूपीएचे नेतृत्व करतील, असे चाको यांनी जाहीर केले. गेल्याच महिन्यात राहुल गांधी यांची लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. या समितीत अहमद पटेल, दिग्विजय सिंह, जनार्दन द्विवेदी, जयराम रमेश आणि मधुसूदन मिस्त्री यांचा समावेश आहे.
काँग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणुका राहुल गांधी यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याचे स्पष्ट संकेत ही समिती स्थापन करताना मिळाले होते. राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील काय, या प्रश्नाचे चाको यांनी थेट उत्तर टाळले.
लोकसभा निवडणुकांनंतर या मुद्यावर काँग्रेसचे खासदार निर्णय घेतील, असे ते म्हणाले. पण काँग्रेसचे नेतृत्व सोनिया गांधी यांनी करायचे आणि पुन्हा सत्ता आल्यास पंतप्रधानपदाची सूत्रे राहुल गांधी यांच्या हाती द्यायची अशी काँग्रेसची रणनिती आहे. राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व सोपविल्यानंतर पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भूमिका काय असेल, असे विचारले असता सोनिया गांधी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या असतील, असे चाको म्हणाले.

Story img Loader