यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच २०१४ च्या लोकसभा निवडणुका लढविण्यात येणार असल्याचे मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले.
सोनिया गांधी या आमच्या नेत्या असून काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आहेत. पक्षाच्या अध्यक्षपदी त्याच कायम राहतील. पक्षाचे प्रवक्ते पी. सी. चाको यांनी ही बाब आधीच स्पष्ट केली आहे. त्यामुळे सोनिया आणि राहुल गांधी यांच्याच नेतृत्वाखाली २०१४च्या निवडणुका लढविण्यात येतील, असे पक्षाचे प्रवक्ते रशीद अल्वी यांनी म्हटले आहे.
पुढील लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या भूमिकेबद्दलचा निर्णय सोनिया गांधी योग्य वेळी घेतील, असे चाको यांनी स्पष्ट केले होते. पुढील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नेतृत्व राहुल गांधी करतील आणि लवकरच ते नवी जबाबदारी स्वीकारतील, असे वक्तव्य चाको यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत केले होते.
राहुल गांधी पुढील निवडणुकीच्या प्रचाराचे नेतृत्व करतील, असे आपण म्हणालो असलो तरी त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपण मत व्यक्त केले. त्यामुळे तसा निर्णय घेण्यात आला आहे, असा त्याचा अर्थ लावण्यात येऊ नये, असेही चाको यांनी स्पष्ट केले.
पुढील निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नावावर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब करण्यात येणार का, असे विचारले असता चाको म्हणाले की, याबाबत निवडणुकीनंतर निर्णय होईल आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण याचा निर्णय पक्षाचे खासदार घेतील.      

Story img Loader