Kerala Woman Greeshma Poisoning case: लष्करी अधिकाऱ्याबरोबर लग्न ठरल्यानंतर बॉयफ्रेंडपासून पिच्छा सोडविण्यासाठी केरळमधील ग्रीष्मा नावाच्या तरुणीनं अतिशय थंड डोक्यानं बॉयफ्रेंड शेरॉन राज याचा खून केला. अनेकदा त्याला ज्यूसमधून अनेक पेनकिलर देऊनही त्याच्यावर काहीही फरक पडत नव्हता. शेवटी ग्रीष्मानं शेरॉन राजला आपल्या घरी बोलावलं आणि आयुर्वैदिक काढा देण्याच्या बहाण्याने त्याला विष पाजलं. यामुळे आठवड्याभरात शेरॉन राजचा मृत्यू झाला. मात्र ग्रीष्मा आणि तिच्या कुटुंबाचं बिंग फुटलं आणि आता तिला केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील नेयट्टींकारा सत्र न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. डोकं सुन्न करणारी ही क्राइम स्टोरी मल्याळम सिनेमाच्या एखाद्या पटकथेसारखी आहे.
नेमके प्रकरण काय?
कन्याकुमारीला राहणारी ग्रीष्मा आणि तिरुवनंतपुरम मधील परसला येते राहणारा शेरॉन राज यांच्यात २०२१ साली महाविद्यालयात शिकत असताना प्रेमसंबंध निर्माण झाले. मार्च २०२२ मध्ये ग्रीष्माच्या कुटुंबियांनी तिचे लग्न एका लष्करी अधिकाऱ्याशी ठरविले. ग्रीष्मानेही यासाठी मान्यता दिली. लग्न ठरल्यानंतरही ग्रीष्मानं शेरॉन राजशी संबंध पूर्णपणे तोडले नाहीत. लग्नाची तारीख जवळ यायला लागली, तेव्हा तिनं शेरॉनला मारण्याची योजना आखली.
शेरॉनला मारण्यासाठी ग्रीष्मानं त्याला अनेकदा पाण्यात पेनकिलरच्या गोळ्या मिसळून दिल्या. पण या डोसचा त्याच्यावर फार काही परिणाम झाला नाही. ही क्लुप्ती तिनं इंटरनेटवर सर्च करून शोधली होती. पाणी आणि ज्यूसमधून पेनकिलरचा मारा करूनही शेरॉन मृत्यूमुखी पडत नाही, हे पाहून तिनं आणखी पुढे जाऊन शक्कल लढवली.
मरण्यापूर्वी मित्राला दिली होती कल्पना
१४ ऑक्टोबर २०२२ रोजी ग्रीष्माच्या लग्नाला एक महिना बाकी असताना तिनं शेरॉनला तिच्या घरी बोलावलं आणि त्याला आयुर्वेदिक काढा प्यायला दिला. या काढ्यात तिनं तणनाशक मिसळले. आयुर्वेदिक काढा हा कडू असतो, हे मानून त्यात शेरॉनला काही वावगं वाटलं नाही. ग्रीष्माच्या घरून निघाल्यानंतर शेरॉनची प्रकृती खालावली. त्याला अस्वस्थ वाटून उलट्या होऊ लागल्या. ज्यामुळं त्याला रुग्णालयात दाखल केलं गेलं. २५ ऑक्टोबर रोजी २३ वर्षीय शेरॉनचा तिरुवनंतपुरममधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी शेरॉननं आपल्या मित्राशी बोलताना ग्रीष्मानं काहीतरी संशयास्पद प्यायला दिल्याचं सांगितलं. तसेच तिनं आपल्याला फसवलं, असंही तो म्हणाला. शेरॉनच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
म्हणून शेरॉनला मारण्याची योजना आखली
ग्रीष्माला ३१ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये तिला जामीन मिळाला. या गुन्ह्यात ग्रीष्माची आई आणि तिच्या काकालाही अटक करण्यात आली होती. गुन्ह्यात मदत करणे आणि पुरावा नष्ट करण्याचा त्यांच्यावर आरोप ठेवला गेला. पोलिसांच्या चौकशीत ग्रीष्मानं सांगितलं की, लग्न ठरल्यानंतर तिनं शेरॉनला संबंध तोडण्यास आणि फोनमधील खासगी क्षणाचे फोटो डिलीट करण्यास सांगितले होते. पण तरीही शेरॉन फोटो आणि व्हिडीओ तिच्या होणाऱ्या पतीबरोबर शेअर करेल, अशी भीती तिला वाटत होती. यातूनच तिनं त्याचा खून करण्याचा निर्णय घेतला.