ओसामा बिन लादेन या कुख्यात दहशतवाद्याला मे २०११ मध्ये अमेरिकेच्या कमांडोजनी यमसदनास धाडले. ओसामाला अबोटाबादमध्ये मारण्यात आले, त्यानंतर तो ज्या घरात लपला होता तिथून अमेरिकेच्या कमांडोजना काही संगणक मिळाले होते. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने बुधवारी अर्थात १ नोव्हेंबरला या संगणकांमधील माहिती जाहीर केली. या संगणकांमधील डेटामध्ये अनेक आत्मघातकी हल्ल्यांचे व्हिडिओ सापडले. याशिवाय अलका याज्ञिक, कुमार सानू आणि उदित नारायण यांनी गायलेल्या गाण्यांचे व्हिडिओही मिळाले.

या डेटामध्ये दिल्लीत २०१० मध्ये झालेल्या हॉकी विश्वचषकाच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील बातमीचा व्हिडिओही होता. इतकेच नाही तर यामध्ये ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राचीही कॉपी आढळली. ‘Omar Sheikh’s Pak handler Ilyas Kashmiri also handled Headley’. या शीर्षकाने केलेली बातमीही होती. ‘सीआयए’ या गुप्तचर संस्थेने जप्त केलेल्या संगणकांमधील सुमारे ४ लाख ७० हजार फाईल्समधील डेटा जाहीर केला. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

जाहीर केलेल्या या माहितीमध्ये १८ हजार डॉक्युमेंट फाईल्स, ८० हजारांपेक्षा जास्त ऑडिओ आणि इमेज फाईल्स तर हजारो व्हिडिओज असल्याचे समोर आले. अॅनिमेशन चित्रपट आणि बॉम्ब हल्ल्याच्या व्हिडिओजचा असा सुमारे १७५ जीबी डेटा जप्त केलेल्या संगणकांमध्ये आढळला. अजय देवगण आणि काजोल यांच्यावर चित्रित झालेले ‘अजनबी मुझको इतना बता’ हे प्यार तो होनाही था या चित्रपटातील गाणे, दिल तेरा आशिक या चित्रपटातील टायटल साँग, ‘तू चाँद है पूनम का’ हे जान ए तमन्ना चित्रपटातील गाणे, ‘ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार’ हा लहान मुलांचा व्हिडिओ, टॉम अँड जेरी कार्टूनचे काही व्हिडिओज, कार आणि इतर खेळांचे अॅनिमेशन असलेले व्हिडिओज आढळून आले. भारताशी संबंधित अनेक व्हिडिओही मिळाले आहेत.

सीआयएने दिलेल्या माहितीनुसार, ओसामा बिन लादेन भारतातील टीव्ही चॅनल्स बघत असे, तसेच वृत्तपत्रांवरही त्याची नजर होती. ओसामा बिन लादेनच्या संगणकातील हार्ड ड्राईव्हमध्ये मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला, डेव्हिड हेडली आणि इलियास कश्मिरी यांच्याबाबत भारतीय प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या बातम्या अशी माहिती असल्याचे समजले. सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यामागे ओसामा बिन लादेनचा हात होता. त्यानंतरच अमेरिका लादेनच्या मागे हात धुऊन लागली होती. या हल्यानंतर १० वर्षांनी म्हणजेच २०११ मध्ये लादेनचा खात्मा करण्यात आला.

Story img Loader