पीटीआय, नवी दिल्ली
देशात सार्वजनिक स्वच्छतागृहांची संकल्पना रुजवून सामाजिक भान जपणारे, सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे मंगळवारी येथील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘सुलभ’च्या मुख्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालविली.
सुलभ इंटरनॅशनल सोशल सव्र्हिस ऑर्गनायझेशनच्या ‘एक्स’ खात्यावरून (पूर्वीचे ट्विटर) देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील पालम-डाबरी मार्गावरील संस्थेच्या मुख्यालयात पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र दुपारी १.४२ वाजता पाठक यांना रुग्णालयात आणण्यात आले, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती ‘एम्स’मधील सूत्रांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे.
बिहारच्या वैशाली जिल्ह्यात रामपूर बघेल या गावात एका ब्राह्मण कुटुंबात पाठक यांचा जन्म झाला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ नोकरी केली. १९६८ साली ‘बिहार गांधी जन्मशताब्दी सोहळा समिती’मध्ये काम करत असताना त्यांना सर्वप्रथम हाताने मैला उचलणाऱ्यांच्या समस्यांची जाणीव झाली. याविषयावर पीएच.डी. करत असताना त्यांनी देशभर प्रवास केला आणि सफाई कामागारांचे आयुष्य जवळून पाहिले. त्याच क्षणी पाठक यांना आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव झाली आणि दोनच वर्षांत त्यांनी ‘सुलभ इंटरनॅशनल’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. उघडय़ावरील मल-मूत्र विसर्जनामुळे पसरणारी रोगराई कमी व्हावी, सार्वजनिक स्वच्छतागृहांपेक्षा अधिक चांगला, पर्यावरणपूरक आणि स्वस्तातील पर्याय सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध व्हावा, या उद्देशाने अनेक शहरे आणि गावांमध्ये ‘सुलभ शौचालये’ उभारली. त्यांच्या सामाजिक दूरदृष्टीमुळे तळागाळातील लाखो लोकांना रोजगरही उपलब्ध करून दिली. या कार्यासाठी पद्मभूषण, एनर्जी ग्लोबल अॅवॉर्ड, दुबई इंटरनॅशनल अॅवॉर्ड फॉर बेस्ट प्रॅक्टिसेस, स्टॉकहोम वॉटर प्राईझ, फ्रान्सच्या सिनेटकडून दिला जाणारा लिजंड ऑफ प्लॅनेट अॅवॉर्ड, इंटरनॅशनल सेंट फ्रानिस प्राईझ अशा अनेक पुरस्कारांनी पाठक यांना सन्मानित करण्यात आले होते.
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून आदरांजली
पाठक यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. ‘‘स्वच्छतेच्या बाबतीत पाठक यांनी क्रांतिकारी बदल घडविले. यासाठी पद्मभूषणसह अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते,’’ असे राष्ट्रपतींनी ‘एक्स’वरील आपल्या शोकसंदेशात लिहिले आहे. तर ‘‘पाठक यांच्या निधनाने देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे. अधिक स्वच्छ भारत घडविणे हे बिंदेश्वरजी यांचे ध्येय्य होते. स्वच्छ भारत अभियानालाही त्यांचा मोठा पाठिंबा लाभला,’’ अशा भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या.
भारताचा ‘टॉयलेट मॅन’
‘स्वच्छ भारत अभियान’ हा शब्द अलिकडे प्रचलित झाला असला तरी पाठक यांनी १९७० सालीच याचा ध्यास घेतल्यामुळे ‘भारताचा टॉयलेट मॅन’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली. ‘सुलभ’ उपक्रमाची सुरूवात केली, तेव्हा त्यांना टीकेचा धनी व्हावे लागले. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या सासऱ्यांचा किस्सा सांगितला होता. ‘‘तुमचे जावई काय करतात, या प्रश्नाचे उत्तर मला देता येत नाही. माझ्या मुलीचे आयुष्य वाया गेले आहे,’’ हे त्यांच्या सासऱ्यांचे शब्द होते.