हिमतनगर (गुजरात) : गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात संशयित चंदिपुरा विषाणूमुळे चार मुलांचा मृत्यू तर दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे प्रशासनातर्फे शनिवारी सांगण्यात आले. दोन मुलांवर हिमतनगरच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व सहा मुलांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे साबरकांठाच्या मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी राज सुतारिया यांनी सांगितले.
हिमतनगर सिव्हिल रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञांना १० जुलै रोजी चार मुलांचा मृत्यू झाल्यानंतर चांदीपुरा विषाणूचा संशय आल्याचे सुतारिया म्हणाले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या राजस्थानमधील दोन मुलांमध्येही सारख्याच विषाणूची लक्षणे आढळल्याचे त्यांनी सांगितले.
मृतांपैकी एक मुलगा साबरकांठा, दोन शेजारील अरवली जिल्ह्यातील आणि एक जण राजस्थानमधील आहे. राजस्थान प्रशासनाला संशयित विषाणू संसर्गामुळे मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली असल्याचे सुतारिया यांनी सांगितले. जिल्हा अधिकाऱ्यांनी बाधित भागात संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पथके तैनात केल्याचेही ते म्हणाले.
चांदिपुरा विषाणूमुळे ताप येतो, सर्दीसारखी लक्षणे आणि मेंदूत तीव्र जळजळ (एन्सेफलायटीस) होते. हा रोगकारक जंतू ‘राबडोविरिडे’ कुटुंबातील ‘वेसिक्युलोव्हायरस’ वंशाचा सदस्य आहे. हा आजार डास, गोचिड (टिक्स) आणि वालुमक्षिका (सँडफ्लाय) आदींद्वारे पसरतो.