मनमाड : लासलगाव रेल्वे स्थानकालगत सोमवारी सकाळी वीजवाहिनी (ओव्हरहेड वायर) दुरुस्त करणाऱ्या इंजिनची (टॉवर) धडक बसल्याने चार कर्मचाऱ्यांचा (गँगमन) मृत्यू झाला. इंजिन चुकीच्या मार्गावर गेल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी काही वेळ रेल रोको आंदोलन केले.
सकाळी खांब क्रमांक १५ ते १७ दरम्यान कर्मचारी रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीचे काम करीत होते. या वेळी लासलगावकडून उगावकडे निघालेले वीजवाहिनी दुरुस्ती करणारे इंजिन चुकीच्या मार्गावर गेल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. इंजिनची धडक बसल्याने गँगमन संतोष केदारे (३०), दिनेश दराडे (३५), कृष्णा अहिरे (४०), संतोष शिरसाट (३८) यांचा मृत्यू झाला. मृतांमधील एक जण मनमाडचा तर उर्वरित तिघे लासलगाव परिसरातील आहेत.
अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्या मार्गावर हा अपघात झाला, तेथे तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेतल्याची चर्चा आहे. आठ ते १० कर्मचारी या ठिकाणी काम करीत होते. देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना भोंगा न वाजविता आलेल्या इंजिनाची चौघांना धडक बसली.
गोदावरी एक्स्प्रेसचा खोळंबा
अपघातानंतर रेल्वे कर्मचारी संतप्त झाले. लासलगाव रेल्वे स्थानकात कर्मचाऱ्यांनी रेल्वे मार्गावर ठाण मांडले होते. त्यामुळे गोदावरी एक्स्प्रेसचा २० मिनिटे खोळंबा झाला. रेल्वे पोलीस, अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.